ब्युरो टीम: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरासह महाराष्ट्रातही प्रचारसभांना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सोलापूर, पुणे तसेच कराडमध्येही सभा होणार आहे. शिक्षणाचे माहेर अशी ख्याती असलेल्या पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी हे नागरिकांना संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पुण्यात मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात दोनदा दौरे झाले आहेत.
आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेण्यात येणार आहे.या सभेच्या निमित्ताने महायुतीनेही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या वाजता हेलिकॉप्टरने रेसकोर्स येथील सभेच्या ठिकाणी मोदी दाखल होणार आहेत. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. तर आजच्या सभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात राजभवन येथे मुक्काम असणार आहे. या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.सुमारे 35 हजार लोकांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त तसेच सभेनिमित्त शहरातील वाहतुकीत आज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहेत. काही मार्गांवर सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील. तसचे बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.
पर्यायी मार्ग कोणते ?
पुणेकरांना पर्यायी मार्ग दिले आहेत त्याचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. मम्मादेवी जंक्शन येथून व बेऊर रस्ता जंक्शन येथून इच्छित स्थळी जाऊ शकता.
खालील रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
गोळीबार मैदान ते भैरोबानाला (सोलापूर रस्ता)
गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी.
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौक (सोलापूर रस्ता)
पंतप्रधानांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा
पुणे- सोलापूर सासवड रस्त्याने येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी भैरोबानाला ते वानवडी बाजार पोलिस चौकीचौक दरम्यान आणि वानवडी बाजार ते मम्मादेवी जंक्शन पार्किंगची सुविधा असेल.
पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी सर्किट हाऊस ते मोरओढा, वॉर मेमोरिअल ते घोरपडी रेल्वे गेट आणि आर्मी पब्लिक स्कूल घोरपडी गाव.
पुणे- सातारा, सिंहगड रस्ता आणि स्वारगेट परिसरामधील वाहनांसाठी बेऊर रोड जंक्शन, कोयाजी रोड अंतर्गत रस्ते, तीनतोफा चौक आणि बिशप स्कूल परिसर.
सर्व बसेससाठी रामटेकडी उड्डाण पुलावरून पुढे हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये पार्किंगची सुविधा.
सर्व व्ही.व्ही.आय.पी. वाहनांसाठी भैरोबानाला चौक ते आर्मी पब्लिक स्कूल दरम्यान एम्प्रेस गार्डन येथे पार्किंग सुविधा करण्यात आली आहे.
सोलापूरमध्येही पंतप्रधानांची होणार सभा
दरम्यान पुण्यातील सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूरमध्येही आज जाहीरसभा होणार आहे. सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात येणार आहेत. शहरातील होम मैदानावर दुपारी दीड वाजता जाहीर सभा होणार असून या सभेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा