Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेवर अजित दादांचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य चर्चेत

 

ब्युरो टीम : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीत मात्र अजूनही नाशिकच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 

महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेऊन देखील राष्ट्रवादीने अद्याप नाशिकच्या जागेचा दावा सोडलेला नाही. त्यातच बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उभं करेल, असे वक्तव्य केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वक्तव्याने महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नाशिकची जागा शिवसेना लढवणार - एकनाथ शिंदे 

नाशिक लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, नाशिकची जागा शिवसेना लढवणार आहे. नाशिक ही पारंपारिक शिवसेनेची जागा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  

नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार - छगन भुजबळ

दरम्यान, छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, असे म्हटले आहे. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने