Onion : मोडीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; केंद्र सरकारने दिली कांदा निर्यातीला परवानगी

 

ब्युरो टीम : गुजरातमधील कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावरुन केंद्र सरकारवर टीका सुरु असताना आता केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश, श्रीलंका, भुतान, बहरैन, युएई आणि मॉरिशस ६ देशांमध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे. एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांची होती मागणी

केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यातबंदी मागील वर्षी केली होती. ही बंदी मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु त्यानंतर सरकारने कांदा निर्यातबंदी वाढवली. यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यासाठी आंदोलने केली. देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होत असलेल्या नाशिकमध्ये शेतकरी वारंवार कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करत होते.

पांढऱ्या कांद्यास दिली परवानगी

परंतु सरकारकडून निर्यातबंदी मागे घेतली जात नव्हती. त्यानंतर गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याची बातमी आली. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दोन हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी निर्णय न घेता सरसकट कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी होऊ लागली. अखेर केंद्र शासनाने ही मागणी मान्य करत एकूण ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने