Prakash Ambedkar : हायकोर्टाने याचिका फेटाळली ; आता वंचित कुणाला पाठींबा देणार आंबेडकरांसमोर पेच

 

ब्युरो टीम: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने वेळेवर अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती. उमेदवार अभिजीत राठोड यांनी नामांकन अर्ज दाखल केला. मात्र त्यामध्ये त्रुटी आढळल्याने यवतमाळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीत त्यांचा अर्ज रद्द ठरवला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्याच्या निर्णयाविरुद्ध अभिजीत राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार नसणार आहे.

अभिजित राठोड यांनी दाखल केलेले नामांकन अर्जामधील काही रकाने रिकामे असल्याचं त्यांना छाननीच्या दिवशी सांगण्यात आलं होतं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसप्रमाणे अभिजीत राठोड यांनी त्रुटीची पूर्तता केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुन्हा त्रुटी काढून उमेदवारी अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरुद्ध अभिजीत राठोड यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका फेटाळून निवडणूक आयोगाकडे जाण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार नसणार आहे. आता वंचित बहुजन आघाडी कोणाला पाठींबा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

यवतमाळमध्ये नेमकी लढत कुणामध्ये?

वाशिम-यवतमाळमध्ये महायुतीकडून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हेमंत पाटील यांना शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध झाला. त्यामुळे पक्षाने ऐनवेळी हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं. त्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. विशेष म्हणजे यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी या खासदार आहेत. पण त्यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने