ब्युरो टीम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुतीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. “देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. माझं महाष्ट्रसैनिकांना एकच सांगायचं आहे, की विधानसभेच्या कामाला लागा”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात जाहीर केली. “या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देण्याबाबत नेमकं काय म्हणाले?
“आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे जाहीर करतो”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
राज ठाकरे यांचं मनसैनिकांना अतिशय महत्त्वाचं आवाहन
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना यावेळी महत्त्वाचं आवाहन केलं. “सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. विधानसभेच्या कामाला लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला मांडायचं असेल तर मांडेल. कुणाची पकपक झाली. तर उद्या दारं खिडक्या उघडणार आहे”, असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे ते लोकसभा निवडणुकीसाठी जास्त इच्छुक नाहीत. पण ते विधानसभा निवडणुकीत महायुतीत असणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट बघायला मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
टिप्पणी पोस्ट करा