ब्युरो टीम : मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 3 पराभवानंतर चौथ्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. मुंबईने या हंगामातील 20 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सला 29 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. रोहित शर्माच्या नावावर या विजयासह एक मोठा रेकॉर्ड झाला. रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. दिल्ली विरुद्धचा विजय रोहित शर्माच्या टी 20 कारकीर्दीतील 250 वा विजय ठरला. तसेच रोहित अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील सहावा खेळाडू ठरलाय.
रोहितआधी किरॉन पोलार्ड, शोएब मलिक, ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण आणि आंद्रे रसेल यांचा समावेश आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम किरॉन पोलार्ड याच्या नावावर आहे. पोलार्ड खेळाडू म्हणून 359 विजयांचा भाग होता. तर शोएब मलिक 325 सामने जिंकला होता. त्याव्यतिरिक्त ड्वेन ब्राव्हो 320, सुनील नरेन 286 तर आंद्रे रसेल 250 सामने जिंकला आहे.
सर्वाधिक विजयात सहभागी असलेले खेळाडू
रोहित शर्मा : 250 आंद्रे रसेल : 250 सुनील नारायण : 286 ड्वेन ब्राव्हो : 320 शोएब मलिक : 325 किरॉन पोलार्ड : 359
रोहित दिल्ली विरुद्ध अर्धशतक ठोकण्यात अपयशी ठरला. रोहितचं अर्धशतक हे अवघ्या 1 धावेने हुकलं. रोहितने 49 धावा केल्या. अक्षर पटेल याने रोहितला फिरकीच्या जाळ्यात फसवलं. रोहितचं अर्धशतक जरी हुकलं असलं तरी क्रिकेट चाहत्यांना त्याची फटकेबाजी पाहता आली.
रोहितने 27 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. रोहितच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये यासह एकूण 491 सिक्सची नोंद झाली आहे. मुंबईने दिल्ली विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीला 235 धावांचं आव्हान मिळालं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावांपर्यंतच मजल मारता आली.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
टिप्पणी पोस्ट करा