Samntha : पूर्वाश्रमीच्या नवऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सोशल मिडीयावर अभिनेत्री समंथाचे सडेतोड उत्तर

 

ब्युरो टीम : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतारांचा सामना केला. 2021 मध्ये ती पती नाग चैतन्यपासून विभक्त झाली. त्यानंतर काही महिन्यांनी तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. मध्यंतरीच्या काळात समंथाने कामातून सहा महिन्यांचा ब्रेकसुद्धा घेतला होता. आता पुन्हा एकदा ती सक्रिय झाली आहे. नुकताच तिने तिच्या युट्यूब चॅनलवर आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट सुरू केला आहे. मात्र घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतरही समंथाला ट्रोल करणं थांबलेलं नाही. तिच्या पॉडकास्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने तिला नाग चैतन्यबाबत खोचक प्रश्न विचारला. त्यावर समंथानेही सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचं उत्तर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.

समंथा तिच्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये मॉर्निंग रुटीनविषयी सांगताना दिसतेय. सकाळी उठल्यापासून ती काय काय करते, याबद्दल ती सांगते. आरोग्याशी संबंधित पॉडकास्ट असतानाही या एपिसोडच्या कमेंटमध्ये एका युजरने समंथाला तिच्या पूर्व पतीबद्दल प्रश्न विचारला. ‘मला सांग, तू तुझ्या निरागस पतीची का फसवणूक केली’, असा सवाल संबंधित युजरने केला. त्यावर समंथाने सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सचं तोंड गप्प केलं.

समंथाने लिहिलं, ‘माफ करा, पण या सवयी तुमच्या कामी येणार नाहीत. तुम्हाला यापेक्षा आणखी काहीतरी मजबूत उपायांची गरज आहे. तुम्हाला शुभेच्छा.’ समंथा तिच्या पॉडकास्टमध्ये योग साधना आणि प्राणायाम यांविषयी सांगत होती. त्यामुळे त्याचा संदर्भ देत तिने युजरला हे उत्तर दिलं.

समंथाचं उत्तर-

समंथा आणि नाग चैतन्य 2010 पासून एकमेकांना डेट करू लागले होते. ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 29 जानेवारी 2017 रोजी दोघांचा हैदराबादमध्ये साखरपुडा पार पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच समंथा आणि नाग चैतन्य विभक्त झाले. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथाने सोशल मीडियावर घटस्फोट जाहीर केला होता.

याआधी इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या सेशनदरम्यान एका युजरने समंथाला पुन्हा एकदा लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारला होता. ‘तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करतेय का’, असं संबंधित युजरने तिला विचारलं होतं. त्यावर उत्तर देताना समंथाने लिहिलं होतं, ‘घटस्फोटाची आकडेवारी पाहता ही वाईट गुंतवणूक ठरेल.’ इतकंच नव्हे तर या उत्तरात समंथाने घटस्फोटाचं प्रमाण सांगणारा डेटासुद्धा पोस्ट केला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने