ब्युरो टीम : सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोन्ही भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन दोन्ही उमेदवारांना बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.
सोलापूरच्या तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे कायम असताना दुपारच्या तप्त उन्हात जुना पुणे चौत्रा नाक्यावरील छत्रफती संभाजी महाराज पुतळ्यापासून सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची विजय संकल्प यात्रा निघाली. नंतर त्यात माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर दाखल झाले. तळपत्या उन्हाची पर्वा न करता हजारो कार्यकर्ते या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींचे मुखवटे घालून कार्यकर्ते भाजप व महायुतीच्या जयजयकारासह ‘जय श्रीराम’ चे नारे लावत होते. हलग्यांचा कडकडाट करीत निघालेल्या या मिरवणुकीत हिंदुत्वाचा गजर केला जात होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, विजय देशमुख, जयकुमार गोरे, समाधान अवताडे या सर्व भाजपच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनराव शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने हे आमदार एकवटले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत भाजपचे आमदार सुभाष देशमुख, मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील-अनगरकर आदी उपस्थित होते. तर माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे निवडणूक अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना माढ्याचे राष्ट्रवादी अजितषपवार गटाचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, माण-खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचृ आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा