ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धा संपल्या संपल्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच बिगुल वाजणार आहे. आयपीएल स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आपआपल्या फ्रेंचायसीसाठी ओपनिंगला येत चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे याच जोडीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ओपनिंग करावी अशी चर्चा रंगली आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने याबाबत आपलं मत मांडलं आहे. लाराने सांगितलं की, “दोन सर्वात अनुभवी खेळाडूंकडून डावाची सुरुवात करणं नकारात्मक प्रभाव पाडू शकते.” रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासाठी ओपनिंग करतो. तर विराट कोहली आरसीबीसाठी ओपनिंग आणि भारतीय संघासाठी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरतो.
ब्रायन लाराने सांगितलं की, “भारतीय संघाने एक अनुभवी आणि एक युवा खेळाडूला घेऊन ओपनिंग करावी. तर दुसऱ्या अनुभवी खेळाडूने तिसऱ्या स्थानावर उतरावं.” ब्रायन लाराने अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावं असंच सांगितल आहे. कारण रोहित शर्मा भारतीय संघासाठी ओपनिंग करतो. “कोण कोणत्या स्थानावर उतरतं याने काहीही फरक पडत नाही. त्याचं काम सुरुवातीच्या 6 षटकात 70-80 धावा करून देणं. या हिशेबाने खेळाडूची निवड करायला हवी. कोण उतरणार याने काहीही फरक पडत नाही.”
“माझ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही खेळाडू महान आहेत. पण सलामीला एक स्पॉट युवा खेळाडूला असणं गरजेचं आहे. त्यामुळे युवा खेळाडूला खेळण्याची एक उर्जा मिळेल. तर एका अनुभवी खेळाडूने मध्यक्रमातील डाव सांभाळावा. दोन्ही अनुभवी खेळाडू ओपनिंगला आले आणि झटपट बाद झाले तर नकारात्मक प्रभाव पडेल. त्यामुळे एका अनुभवी खेळाडूला ओपनिंगला आणि दुसऱ्याला तिसऱ्या स्थानावर ठेवेन.”, असं ब्रायन लारा म्हणाला.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडसोबत 5 जूनला आहे. त्यानंतर 9 जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी सामना होणार आहे. एप्रिलच्या शेवटी टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे, हे आधीच स्पष्ट झालं आहे.
टिप्पणी पोस्ट करा