तुम्हाला माहित आहे का 1 जून हा वाढदिवसांचा दिवस का आहे ?


    ब्युरो टीम : आज 1 जून तुमच्या ओळखीतल्या एखाद्याचा किंवा अनेकांचे आज वाढदिवस (Birthday on 1st June) असतील. आज फेसबुक वॉलपासून ते व्हॉट्सअप ग्रुप्सवरही खास करुन तुमच्या फॅमेली ग्रुप्सवर सकाळपासूनच शुभेच्छांचा पाऊस पडत असणार यात काहीच शंका नाही. पण 1 जूनला एवढ्या लोकांचा वाढदिवस असण्याचं नेमकं कारणं तुम्हाला ठाऊक आहे का? 

    एका अंदाजानुसार भारतातील प्रत्येक 5 व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस हा 1 जून रोजी असतो. आता यामागील कारण अगदीच सूचक शब्दांमध्ये सांगायला गेल्यास "जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे…!" असं एका ठिकाणी साहित्यकारांनी म्हटलं आहे. आता या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न असेल तर 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा वाढदिवस म्हणजे 'ऑन पेपर बर्थ डे' होय. 

    पूर्वीच्या काळी म्हणजे 1970 च्या दशकाच्या आसपास अगदी 50 ते 55 वर्षांपूर्वीपर्यंत सध्या ज्या पद्धतीने जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते तसा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे जन्माचा दाखला आता जितका महत्त्वाचा आहे तितका महत्त्वाचा दस्तावेज नव्हता. त्याच प्रमाणे पूर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधाही फारश्या प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. बहुतांश महिलांची प्रसुती ही घरच्या घरीच व्हायची. त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असण्याचा फारसा संबंध नव्हता. अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना मास्तरही 1 जून तारीख ही जन्मदिनांक नोंद करुन घ्यायचे. त्यामुळेच अनेकांच्या शालेय दाखल्यावर हीच तारीख वाढदिवस म्हणून दाखवली गेली. 

    नंतर जन्माच्या दाखल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने अनेकांनी जन्माचा पुरावा म्हणून पुढे हाच 1 जूनची नोंद असणारा दाखला वापरण्यास सुरुवात अन् या 1 जूनच्या सार्वजनिक वाढदिवसाला सुरुवात झाली. याच अनुषंगाने मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही कायमची म्हणजेच 'ऑन पेपर' जी 1 जूनच असते हे लक्षात येते. यामुळे अनेकांचा वाढदिवस या तारखेला असतो, म्हणून या दिवसाला वाढदिवसांचा दिवस असंही म्हणतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने