Adani : डिजिटल पेमेंट क्षेत्रतील तीव्र स्पर्धेत ग्राहकांचा फायदा होणार? अदानी समूह आता यूपीआयसह मैदानात उतरणार

 

ब्युरो टीम : गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूह युपीआय ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. युपीआय क्षेत्रात यापूर्वी अनेक दादा कंपन्या सेवा देत आहे. अदानी समूह आल्यानंतर या सर्वच क्षेत्रात तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल. ग्राहकांना त्यामुळे अनेक ऑफर्स मिळतील. अदानी समूह गुगल पे, फोन पे आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला या क्षेत्रात टफ फाईट देण्याची शक्यता आहे. तर वाढत्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याची शक्यता आहे.

परवाना घेण्यासाठी प्रक्रिया

फायनेन्शिअल टाईम्सने एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, देशात डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स आणि युपीआयच्या कक्षा रुंदावल्या आहेत. युपीआयचा डंका आता परदेशात पण वाजत आहे. त्यामुळे याक्षेत्रात अदानी समूह उतरण्याचा विचार करत आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेसह इतर संस्थाकडे रीतसर अर्ज प्रक्रिया करण्यात येईल. परवाना मिळवल्यानंतर अदानी वन या क्षेत्रात पाऊल टाकेल. यासोबतच क्रेडिट कार्ड क्षेत्रात पण कंपनी लवकरच पाऊल टाकण्याची शक्यता आहे.

अदानी समूह, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) या सरकारच्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यामुळे अदानी समूहाला वेगळ्या प्लॅटफॉर्म निर्मितीची आणि त्यावरील खर्चाची गरज भासणार नाही. तर सरकारला त्यातून मोठा महसूल मिळण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने 2022 मध्ये अदानी वन नावाचे ॲप सुरु केले होते. त्यावरच आर्थिक आणि व्यावसायिक सेवा देण्याचा विचार करण्यात येत आहे.

कंपनी या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना गॅस, वीज आणि इतर बिल भरण्याची संधी देणार आहे. तर ग्राहकांना या प्लॅटफॉर्मवर व्यावसायिक संधी पण उपलब्ध होतील. बिल भरणा केल्यास ग्राहकांना काही पॉईंट देण्यात येतील. पॉईंट जमा झाल्यावर ग्राहकांना शॉपिंग करता येईल. तर काही पेमेंटवर त्यांना चांगल्या ऑफर्स पण मिळतील.

अदानी समूह या क्षेत्रात उतरल्यास तीव्र स्पर्धा येईल. गुगल पे, फोन पेसह इतर यूपीआय खेळाडूंसमोर मोठे आव्हान उभे ठाकेल. तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला पण एक प्रतिस्पर्धी वाढेल. ग्राहकांना अजून एक सुविधा देणारे ॲप उपलब्ध होईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने