ब्युरो टीम : मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण केवळ मी साहेबांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही ; हा कोणता न्याय ? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. शिरूरमधल्या सभेत बोलताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. पवार साहेब आमचं दैवत आहेत, पण 80 व्या वर्षानंतर तरी त्यांनी थांबल पाहिजे, नव्या लोकांना संधी दिली पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर पुन्हा टीका केली. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना अजित पवार यांनी त्यांच्या मन की बात सांगितली.
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावलला गेलो. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला असे अजित पवार म्हणाले. शरद पवार आमचं दैवत आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु प्रत्येकाचा काल असतो. कुठंतरी 80 वर्षांच्या पुढं गेल्यानंतर थांबलं पाहिजे, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. मी पण आता 60 वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवसं थांबायचं ? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही ? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. आम्ही काही चुकीचं वागतो का ? त्यामुळे भावनिक होऊ नका, असे ते म्हणाले.
मी कामाचा माणूस आहे
शरद पवार यांच्याकडे जिल्हा बँक नव्हती, ती इतरांच्या हातात असायची. मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक ताब्यात घेतली. 1991 पासून ते आजपर्यंत जिल्हा बँक, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवली, असा दावा अजित पवार यांनी केला. पिंपरी चिंचवड ताब्यात नव्हती, 1992 पासून 2017 पर्यंत ताब्यात ठेवलं आणि चांगलं शहर केलं.
मी कामाचा माणूस आहे, मी एखादी गोष्ट मनावर घेतली की मी ती करतोच. बारामती कशा पद्धतीने बदलली ते एकदा येऊन बघा. अनेक लोकं आम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपल्या मतदारसंघात बारामतीसारखा विकास करू. म्हणजे आम्ही कायतरी केलंय ना? की तिथं गोट्या खेळलो का? कामच केलंय ना? याचा विचार कुठेतरी करणार की नाही , अशा शब्दात अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
माझ्याकडे जादूची कांडी आहे का ?
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत अजित पवार यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. या आरोपांनाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. शिरुरच्या सभेत बरळले अनेकजण, अजित पवारांनी कारखाना बंद पाडला, असे आरोप केले. अजित पवार डायरेक्टर नाही, चेअरमन नाही, व्हाइस-चेअरमन नाही की काही नाही, मग अजित पवारांनी कसा बंद पाडला ? मग माझ्याकडे काय जादूची कांडी आहे का ? असा खोचक सवाल त्यांनी केला.
अरे तुम्हा लोकांना, तिथे असलेल्या चेअरमनना कारखाना चालवता आला नाही, संचालकांनी कर्ज काढलं, 25 वर्षं चांगलं चाललेला कारखाना कर्जबाजारी केला त्यांनी आणि माझ्या नावावर पावती फाडता काय ? उलट मी माझ्या भागतले कारखाने चांगले चालवतो, सोमेश्वर, माळेगावचा भाव जास्त आहे. अशाच संस्था चालवत नाही. काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल करतायत असा आरोपही अजित पवार यांनी केला.
टिप्पणी पोस्ट करा