ब्युरो टीम : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील ‘बाळू’ या पात्राने अभिनेता भाऊसाहेब शिंदे याला महाराष्ट्रभरात ओळख दिली. या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेत सिनेसृष्टीत दाखल झालेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे नेहमीच नवनवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिका भाऊसाहेब शिंदे याने गाजवली आता भाऊसाहेब शिंदे नव्या सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा मराठी आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. ‘गोवर्धन’ हा भाऊसाहेब शिंदेचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
भाऊसाहेबच्या ‘रौंदळ’ चित्रपटामधलं अॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोवर्धन’ या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
सिनेमाची गोष्ट काय आहे?
गोवर्धन’ या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो. भाऊसाहेबने नेहमीच आपल्या मातीतील सिनेमे बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘गोवर्धन’ हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. पोस्टर पाहिल्यावर याची खात्री पटते. या चित्रपटात भाऊसाहेबचे गायी-वासरांचं रक्षण करणाऱ्या ‘गोवर्धन’चं रूप पाहायला मिळणार आहे.
भाऊसाहेब शिंदे म्हणाला…
‘गोवर्धन’बाबत भाऊसाहेब शिंदे याने प्रतिक्रिया दिली. ‘गोवर्धन’ या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन रूपात दिसणार असलो. तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. देशातील भयाण वास्तव रुपेरी पडद्यावर सादर करत समाजाला आरसा दाखवण्याचं कामही हा चित्रपट करेल यात शंका नाही. हिंदू धर्मात गायीला माता मानली जाते. तिच्या ठायी तेहतीस कोटी देवांचं वास करत असल्याचं मानलं जातं. त्याच गोमातेच्या रक्षणार्थ उभ्या ठाकलेल्या नायकाची कथा ‘गोवर्धन’मध्ये आहे, असं भाऊसाहेब शिंदे म्हणाला.
टिप्पणी पोस्ट करा