ब्युरो टीम : बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या कोऱ्या सिझनचं सूत्रसंचालन आता अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. आधी बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन अभिनेते महेश मांजरेकर करत होते. मात्र आता रितेश सूत्रसंचालन करणार असल्याने यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधला फर्स्ट रनरअप जय दुधाणे याने या सगळ्यावर प्रतिक्रया दिली आहे. कलर्स मराठीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही जय दुधाणेची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रमोशनवेळी जय दुधाणे याने ‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या सिझनवर प्रतिक्रिया दिली आहे.
“महेश मांजरेकर चावडीवर आले की…”
रितेश देशमुख हे सिनियर अभिनेते आहेत. त्यांनी हिंदी आणि मराठीमध्ये काम केलं आहे. पण महेश सर जेव्हा चावडीवर यायचे. तेव्हा तिथं असणाऱ्या आम्हा कुणामध्येही हिंमत नव्हती की, जरा जागचं देखील आम्ही हलू… जेव्हा सर बोलायचे तेव्हा सगळे शांत असायचे. त्यांचा एक दरारा होता, असं जय दुधाणे म्हणाला. एका मुलाखतीत जयने हे मत मांडलं.
जय दुधाणेकडून बिग बॉसमधील अनुभव शेअर
बिग बॉसमध्ये मला तर खूप बोलणी बसायची. दुसरं कुणी काही केलं तरी मलाच बोलणी बसणार हे मी गृहित धरून होतो. पण महेश सर इज महेश सर यार… महेश सरांचा एक वेगळाच ऑरा आहे. आता जेव्हा बिग बॉसचा नवा सिझन येईल. तेव्हा कळेल की रितेश सर कसं सूत्रसंचालन करणार ते…, असं जय म्हणाला.
बिग बॉस हिंदी ओटीटी जेव्हा आलं होतं. तेव्हा करण जोहरला होस्ट करण्यात आलं होतं. पण ते वर्कआऊट नाही झालं. सलमान खान इज सलमान खान… त्यामुळे मला वाटतं की, मला महेश सरच होस्ट म्हणून बघायला आवडले असते. कारण महेश मांजरेकर इज द रिअर बिग बॉस, असं जय दुधाणे म्हणाला.
टिप्पणी पोस्ट करा