अबब... बीड जिल्ह्यातील अभियंत्याकडे तब्बल कोट्यावधी रुपयांचे घबाड

 


    ब्युरो टीम : बीड जिल्ह्यातील माजलगावच्या पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर याला 28 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते यानंतर आज शुक्रवारी त्याच्या सांगलीमधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये तपासणी केली असता सोन्याचे बिस्किट, रोख रक्कम असे मिळून तब्बल 1 कोटी 61 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांना सापडला आहे.

    या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग येथे तक्रारदाराने अर्ज दिला होता. सदर अर्जावरून मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्यासाठी परवानगी देण्यासाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे सात जणांचे 35 हजारांची मागणी करून तडजोडअंती प्रत्येकी 4 हजार प्रमाणे 7 जणांसाठी एकूण 28 हजारांची लाच स्वीकारताना सलगरकर याला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल होते, त्याच्यावर या संदर्भात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 

    आज राजेश सलगरकर याचे सांगली येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असलेले लॉकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपासण्यात आले. या लॉकरमधील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे बिस्किट पोलिसांना आढळून आले आहेत. ज्यात रोख रक्कम 11 लाख 89000 रुपये, एकूण 2 किलो 105 ग्रॅम सोने किंमत अंदाजे 1 कोटी 50 लाख  असा एकूण 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयाचा ऐवज सापडला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने