ब्युरो टीम : राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीत मुस्लिमांच्या लांगूलचालनाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसला. त्यांनी एका शब्दानेही त्याचा निषेध नोंदवला नाही. त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही. हे अत्यंत वाईट आहे. तुम्ही कुणाचे सुपुत्र आहात हे विसरलात का? असा सवाल करतानाच आमच्यावर जर निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तानचा झेंडा हातात घेण्याची वेळ आली असती तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी महामुलाखत घेतली. या महामुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांना माझा साधा प्रश्न आहे. इतकी वर्ष हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या हिंदू बांधवांनो आणि मातांनो अशी केली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणात आले. तुम्हीही राजकारणात आल्यापासून ते ही निवडणूक सुरू होण्यापर्यंत माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो… अशी भाषणाची सुरुवात करायचा. पण इंडिया आघाडीच्या सभेत तुम्ही हिंदू म्हणणं टाळलं. देशभक्त बांधवंनो म्हणायला हरकत नाही. पण हिंदू का सोडलं?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विचारांचा वारसा शिंदेंकडे
हिंदू म्हणायची लाज वाटते तुम्हाला? ते हिंदू म्हणूच शकत नाही. कारण ज्यांच्या भरवश्यावर निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यांना राग येईल, ते नाराज होतील, ही भीती मनात असल्यामुळेच त्यांनी भाषणातून हिंदू म्हणणं सोडलं. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हे चाललं आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं जात आहे. ते या अनुषंगाने. तुम्ही बाळासाहेबांचे सुपुत्र आहात. यात दुमतच नाही. पण विचारांचा वारसा त्यांच्याकडे नाही. विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे, असं फडणवीस म्हणाले.
म्हणूनच मुस्लिमांचं लांगूल चालन
मुस्लिम मतांमुळेच आपण जिंकू शकतो हे लक्षात आल्यानंतर उबाठाने टिपू सुलतान जयंती साजरी करणे, शिवसेनेच्या मशालीचे पटके घालून शिवसेना जिंदाबादचे नारे देणे, हे जाणीवपूर्वक सुरू केलं. रॅलीत अल्ला हू अकबरचे नारे दिले गेले. हे बाळासाहेबांनी खपवून घेतलं नसतं. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा आरोपी त्यांचा स्टारप्रचारक आहे. त्यांचा प्रचार करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे होते. शरम वाटली पाहिजे. कुणाचे सुपुत्र आहोत आपण? साधा निषेधाचा शब्द नाही. त्याचं स्पष्टीकरण नाही. मी स्पष्ट सांगतो, निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. आमच्यावर ही वेळ आली असती तर एखादी निवडणूक हरावी लागली असती तर आम्ही हरलो असतो. मात्र, आपल्याला पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरायचं आहे, मुस्लिमांचं लांगूलचालन करायचं आहे, त्यांच्यासाठी पायघड्या घालायच्या आहेत, असं करायची वेळ आली असती तर निवृत्ती घेतली असती…, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
टिप्पणी पोस्ट करा