ब्युरो टीम : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा केला आहे. तसेच त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलिन करायचा की नाही याचा निर्णय निवडणुकीनंतरच घेऊ असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन होऊ शकतो हेच फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना असं जर म्हणायचं असेल तर त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात असेल तर तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. शरद पवारांनी यापूर्वी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले. आता त्यांनी संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार त्यांचा पक्ष विलीन काँग्रेसमध्ये करतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस आज धुळ्यात आहेत.
आठही जागा जिंकू
उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळत आहे. आमच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आम्ही आठही जागा चांगल्या फरकाने जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये हिना गावित रेकॉर्ड मताने जिंकतील. धुळ्याला देखील सुभाष भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ठाकरेंच्या काळात मराठी माणूस निर्वासित
मराठी माणसाला जॉब नाकारला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पहिली गोष्ट अशी मराठी माणसाचे ठेकेदार कोण आहेत? ते म्हणजे मराठी नाही. आम्ही देखील मराठीच आहोत. मराठी माणसांचा पक्ष आमच्या सोबत आहे. मुंबईतील मराठी माणसाला कोणी जर निर्वासित केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.
मोदींमुळे लोन मिळाले
आज मोदींनी मुद्रा सारखी योजना आणली. बिना गॅरेंटी, बिना तारण लोन मिळाले. मोदींनी सगळ्या लोकांची गॅरंटी घेतली आणि 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना लोन मिळाले. देशात बचत गट तयार केले. त्याला 8 लाख कोटी दिले. मोदी म्हणतात पुरुष पायावर उभे राहतो, तेव्हा एक केवळ पुरुष पायावर उभे राहतात. एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब उभे राहते, असं ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा