Electtion : महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

ब्युरो टीम : महाराष्ट्रात लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं आहे. पण दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान बंद पडलं. तर काही ठिकाणी मतदारांसाठी कोणत्याही सोयीसुविधा मतदान केंद्रावर बघायला मिळाल्या नाहीत. ऊन्हाळ्याचं भर ऊन तापत असताना मतदानकेंद्रांवर मतदारांसाठी साधी पिण्याची पाण्याची देखील व्यवस्था नव्हती, असादेखील प्रकार काही ठिकाणी समोर आल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. काही ठिकाणी मतदानकेंद्रांवर प्रचंड दिरंगाई केला जात असल्याचा आरोप केला जातोय. कारण नागरीक तासंतास मतदानासाठी रांगेत उभे राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. हेही असे की थोडे भिवंडी लोकसभा मतदारसंघात तर निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाने अक्षरश: टोक गाठलं आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर आलाय. मतदार यादीमधून हजारो नागरिकांचे नाव गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे ज्या मतदारांनी इथून मागे दोन-तीन वेळा मतदान केले त्या मतदारांचं देखील नाव निवडणुकीच्या यादीतून गायब आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय . संबंधित प्रकाराची संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरु आहे.

फक्त मतदानासाठी अमेरिकेतून आलेल्या तरुणाचं यादीत नावच नाही

विशेष म्हणजे अवधूत दातार नावाचा तरुण अमेरिकेहून कल्याणमध्ये फक्त मतदानासाठी आला होता. मात्र सकाळी त्याचं नाव मतदार यादीत नसल्याचे पाहून त्याला देखील धक्का बसलाय. आज सकाळपासून तो विविध मतदान केंद्राच्या फेऱ्या मारत आपलं नाव शोधतोय. मात्र अखेर त्याचं नाव कुठेच नसल्याने त्याची निराशा झाली. याबाबत नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. हीच लोकशाही आहे का? असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

तांबोळी कुटुंबातील तीन सदस्यांची नावेच नाहीत

कल्याण पश्चिम येथील स्थानिक रहिवासी साजिद तांबोळी यांनादेखील असाच अनुभव आला आहे. साजिद यांच्या कुटुंबातील तब्बल तीन जणांची नावे मतदार यादीतून गायब झाले आहेत. विशेष म्हणजे तीनही जणांनी याआधी विविध निवडणुकांमध्ये मतदान केलं आहे. साजिद यांनी निवडणूक आयोगाच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर संपर्क करुन याबाबत चौकशी केली. यावेळी साजिद यांना कल्याणमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालय जाण्यास सांगितलं.

साजिद निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला गेले तेव्हा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी नावे चेक केली. यासाठी त्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये असलेला सर्व डेटा तपासला. पण तरीही त्यामध्ये साजिद यांच्या कुटुंबातील तिघांची नावे नव्हती. यावेळी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याने MT सीरिजचे वोटिंग कार्ड डिलीट झाल्याची माहिती दिली. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या नजरचुकीने झालाय की दुसरं तांत्रिक कारण आहे याचा तपास लावणं महत्त्वाचं आहे. कारण संबंधित प्रकारामुळे हजारो नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेला आहे.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :


भिवंडी- 48.89 टक्के

धुळे- 48.81 टक्के

दिंडोरी- 57.06 टक्के

कल्याण – 41.70 टक्के

मुंबई उत्तर – 46.91 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के

मुंबई दक्षिण – 44.22 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 48.26 टक्के

नाशिक – 51.16 टक्के

पालघर- 54.32 टक्के

ठाणे – 45.38 टक्के

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने