ब्युरो टीम : टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले असताना बीसीसीआयने आतापासून हेड कोच पदासाठी अर्ज मागवले आहेत. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपत आहे. त्यासाठी बीसीसीआयने आतापासूनच शोधाशोध सुरु केली आहे. कारण टी20 वर्ल्डकपमध्ये काहीही निकाल लागला तरी प्रशिक्षकपदाची जागा भरणं गरजेचं आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडने आपला कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ती जागी काहीही करून भरावी लागणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून अनेक नावं चर्चेत आली आहेत. विदेशी कोचच्या शर्यतीत फ्लेमिंग आणि लँगर यांची नाव आघाडीवर आहेत. आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलामीवीर गौतम गंभीर याचं नाव चर्चेत आलं आहे. बीसीसीआयच्या आवडीच्या उमेदवारापैकी हे एक नाव आहे. गौतम गंभीर सध्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटॉरची भूमिका बजावत आहे. कोलकात्याने यावर्षी चांगली कामगिरी केली असून गुणतालिकेत टॉपला आहे.
ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरशी संपर्क साधला होता. आता पुढची बोलणी आयपीएलचं पर्व संपल्यानंतर केली जातील. गंभीरने ही विनंती मान्य केली तर त्याला केकेआर संघ सोडावा लागेल. कारण बीसीसीआयच्या कराराखाली असलेले इतर लीगमध्ये काम करू शकत नाहीत. दुसरीकडे, बीसीसीआयने हेड पोस्टसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. त्यात अर्जदारांना 27 मे पर्यंत आपला अर्ज दाखल करायचा आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडने आपला कार्यकाळ वाढवणार नसल्याचं बीसीसीआयला आधीच सांगितलं आहे.एनसीएचे विद्यमान अध्यक्ष असलेले व्हीव्हीएस लक्ष्मणही या पदासाठी अर्ज करण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे.
गौतम गंभीर 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्याने 122 चेंडूत 97 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. तसेच त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2012 आणि 2014 जिंकले होते. पण भरघोस यश मिळवणाऱ्या गौतम गंभीरला आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत स्तरावर प्रशिक्षकपदाचा अनुभव नाही. आयपीएल फ्रँचायझीच्या कोचिंग स्टाफचा प्रभारी होता. आता त्याचा टीम इंडियाला किती फायदा होईल आणि तो ही ऑफर स्वीकारतो का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
टिप्पणी पोस्ट करा