ब्युरो टीम : इंडिया आघाडीला संपूर्ण बहुमत मिळाल्यास 48 तासातच पंतप्रधानाची निवड केली जाईल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं. तसेच ज्यांच्या जागा अधिक असतील त्यांचा पंतप्रधान होईल, असं सांगत पंतप्रधान निवडण्याचा फॉर्म्युलाही त्यांनी स्पष्ट केला. येत्या 1 जून रोजी सातव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना हा दावा केला. तसेच इंडिया आघाडीला 272 पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचंही स्पष्ट केलं.
इंडिया आघाडीची सत्ता आल्यास एनडीएचे मित्र पक्ष आमच्या आघाडीत येऊ शकतात. मात्र, त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमान घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांना नीतीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? असा सवाल करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. नीतीश कुमार हे पलटी मारण्यात माहीर आहेत. चंद्राबाबू 2019मध्ये काँग्रेस आघाडीत होते, असं जयराम रमेश म्हणाले.
दोन ‘आय’चं अंतर
इंडिया आणि एनडीएमध्ये दोन ‘आय’चं अंतर आहे. आय फॉर इन्सानियत आणि आय फॉर इमानदारी. ज्या पक्षांमध्ये इन्सानियत आणि इमानदारी आहे, पण ते एनडीएमध्ये आहेत, असे पक्ष इंडिया आघाडीत येऊ शकतात. जनादेशानंतर होणारं सरकार हे हुकूमशाहचं राहणार नसून जनतेचं सरकार असेल, असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.
स्पष्ट आणि निर्णायक बहुमत
मात्र, इंडिया आघाडीत घ्यायचं की नाही हे सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे ठरवतील. आम्हाला या निवडणुकीत मोठं यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहा टप्प्यातील राजकीय परिस्थितीबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मी आकडेमोड करण्याच्या भानगडीत पडणार नाही. मात्र, इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळेल हे नक्की आहे. 273 हे स्पष्ट बहुमत आहे. पण निर्णायक नाही. जेव्हा मी स्पष्ट आणि निर्णायक बहुमत म्हणतो तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ 272 जागांपेक्षा अधिक जागा मिळतील असा आहे. 2004मधील निकाल 2024मध्ये पुन्हा लागणार आहे. काँग्रेसला राजस्थान, कर्नाटक, तेलंगना आणि महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला.
20 वर्षानंतर मोठं यश मिळेल
छत्तीसगड, आसाम आणि मध्यप्रदेशात आमच्या कामगिरीत सुधारणा होणार आहे. एकूण पाहता आम्ही 20 वर्षानंतर 2004 सारख्या परिस्थितीकडे जात आहोत. उत्तर प्रदेशात आम्हाला फायदा होणार आहे. भाजपला 2019मध्ये 62 जागा मिळाल्या होत्या. त्यात त्यांची सुधारणा होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
टिप्पणी पोस्ट करा