ब्युरो टीम : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या नाटकातील त्याच्या अभिनयाचं नाट्यरसिकांकडून कौतुक तर होतंच आहे, पण प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धनने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. अभिनयबद्दलच्या क्षितीजच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. इन्स्टाग्रामवर त्याने अभिनयचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. ‘बरीच मुलं वारसा घेतात, याने वसा घेतलाय’, असं त्याने लिहिलंय.
क्षितीज पटवर्धनची पोस्ट-
‘मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे उभा अभिनय. फोटो काढताना असं वाटलं की बरीच मुलं वारसा घेतात, याने वसा घेतलाय. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी असेल. अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार, आणि उत्स्फूर्त अभिनेता. आज्जीबाई जोरात पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आईवडलांची पुण्याई,’ अशा शब्दांत क्षितीजने अभिनयचं कौतुक केलं आहे.
क्षितीजच्या या पोस्टवर अभिनयनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या संधीबद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. आपल्या नाटकाने मला खूप गोष्टी दिल्या आहेत. अभिनेता म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण माझ्या वर हा विश्वास दाखवल्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार आणि खूप खूप खूप खूप खूप जास्त प्रेम,’ असं त्याने लिहिलंय.
या पोस्टवर मराठी चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नेटकऱ्यांनीही अभिनयचं कौतुक केलं आहे. अभिनयनं ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी’ मिळालं होतं. पहिल्या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर अभिनयचा दुसरा ‘अशी ही आशिकी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘रंपाट’मध्येही त्याने भूमिका साकारली. ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटात अभिनयने ‘बिग बॉस’ फेम तेजस्वी प्रकाशसोबत काम केलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा