आजपासून LPG व विमान प्रवास स्वस्त, जाणून घ्या आजपासुन होणाऱ्या अश्या 5 बदलांबद्दल


   ब्युरो टीम : नवीन महिना म्हणजेच जून महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आजपासून 72 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत कपात केल्यामुळे हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो. तसेच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी व  पंजाब नॅशनल बँकेतील खातेधारकांसाठी देखील काही बदल झाले आहेत.   

आजपासून झालेल्या अशा 5 बदलांबद्दल जाणुन घेऊ 

1. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या 72 रुपयांनी स्वस्त:  तेल विपणन कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 72 रुपयांनी कमी केली आहे. दिल्लीतील किंमत आता 69.50 रुपयांनी कमी होऊन 1676 रुपये झाली आहे. यापूर्वी ते 1,745.50 रुपयांना उपलब्ध होते. कोलकत्ता मध्ये हा सिलेंडर आता 72 रुपयांनी कमी होऊन 1787 रुपयांना मिळत आहे, पूर्वी त्याची किंमत 1859 रुपये होती. तर मुंबईत सिलिंडरची किंमत 69.50 रुपयांनी कमी होऊन 1698.50 रुपयांवरून 1629 रुपयांवर आली आहे. आता चेन्नईमध्ये 1840.50 रुपयांना हा सिलिंडर उपलब्ध आहे. तथापि, 14.2 KG घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

2. एव्हिएशन टर्बाइन इंधनची किंमत 7,044.95 रुपयाने कमी, हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो : तेल विपणन कंपन्यांनी महानगरांमध्ये एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्लीतील एटीएफ 6,673.87 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 94,969.01 रुपये प्रति किलोलिटर (1000 लिटर) झाले आहे. तर चेन्नईमध्ये एटीएफ 7,044.95 रुपयांनी स्वस्त झाला असून ते 98,557.14 रुपये प्रति किलोलिटर झाला आहे.

3. आधार-पॅन लिंक नसल्यास, तुम्हाला अधिक कर भरावा लागेल : तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नसेल, तर आजपासून अधिक टीडीएस कापला जाईल. आयकर विभागाने करदात्यांना ३१ मे पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले होते. सध्या पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये शुल्क आकारले जात आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन देखील निष्क्रिय होईल. 

4. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी खाजगी प्रशिक्षण केंद्र किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चाचणी : आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) चाचणी देण्याची गरज नाही. तुम्ही खाजगी प्रशिक्षण केंद्र किंवा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन तुमची ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकाल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. तसेच आता अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना पकडल्यास त्याच्या पालकांवर कारवाई करण्यात येणार असून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय, वाहन मालकाचे नोंदणी कार्ड रद्द केले जाईल आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत अल्पवयीन व्यक्ती परवान्यासाठी अपात्र असेल.

5. तीन वर्षांपासून कोणतेही व्यवहार नसलेली खाती होणार बंद : जर तुमचे बँक खाते पंजाब नॅशनल बँकेत असेल आणि तुम्ही त्यात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार केला नसेल तर ते खाते बंद केले जाईल. याबाबत माहिती देताना बँकेने म्हटले आहे 'आम्ही अशा सर्व खातेधारकांना नोटीस दिली आहे, ज्यांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत 3 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचे खाते चालवले नाही आणि त्यांच्या खात्यात कोणतीही शिल्लक नाही.' नोटीस दिल्यानंतर एक महिन्यानंतर ही खाती बंद केली जातील. बँकेने यासंदर्भात 6 मे रोजी आपल्या X हँडलद्वारे ही सूचना शेअर केली होती. पीएनबीने सांगितले की, या खात्यांचा गैरवापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी बँकेने अशी खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने