ब्युरो टीम : चेन्नई सुपर किंग्सचं आयपीएलच्या 17 व्या मोसमातून पॅकअप झालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सवर आवश्यक फरकाने मात करत 14 गुणांसह प्लेऑफमधील चौथं स्थान पटकावलं. तर पराभवामुळे चेन्नईचं प्लेऑफचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यानंतर आता प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी 21 मे रोजी सनरायजर्स हैदराबादवर मात करत फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर आज 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा विकेटकीपर बॅट्समन महेंद्रसिंह धोनी याने फेसबूक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.
धोनीचा मोठी घोषणा
महेंद्रसिंह धोनीने फेसबूकवर 3 वाक्यांची पोस्ट केली आहे. धोनीने या पोस्टमधून मोठी घोषणा केली आहे. “झेप घेण्याची वेळ आहे. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वत:ची टीम सुरु करत आहे!” असं महेंद्रसिंह धोनीने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय. आता धोनीची नवी टीम कोणती असणार? ती टीम क्रिकेट संबंधित असणार की आणखी काही? याबाबतची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आणि धोनीच्या फॉलोवर्सला आहे.
आयपीएलमध्ये धोनीची स्वत:ची टीम?
धोनीने याआधी घेतलेले अनेक निर्णय हे आश्चर्यकारक राहिले आहेत. धोनीने निवृत्तीचा निर्णयही कुणाला ध्यानी मनी नसताना घेतला होता. तसेच धोनीच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टचा निर्णय जशाच्या तसा घेणंही चुकीच ठरेल, कारण धोनी अशा पोस्टमधून जाहिरातीबाबतही प्रमोशन करत असतो. धोनीने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये मी माझी स्वत:ची टीम सुरु करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ही टीम क्रिकेट संबंधित असून धोनी आयपीएलमध्ये टीम घेणार आहे का? अशी चर्चा रंगली आहे. तर दुसऱ्या बाजूला धोनी स्वत:चं आणखी काही सुरु करुन तिथे आपली टीम आणणार असावा, अशीही चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा