Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा गॅलेक्सीत दाखल; सततच्या उपोषणामुळे प्रकृतीत अस्वस्थता

 

ब्युरो टीम : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठवाड्यात बैठका आणि सभांचा धडाका सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी याआधी वारंवार उपोषण केलं आहे. उपोषणामुळे अनेकदा मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. पण तरीही ते स्वत:च्या जीवाचा विचार न करता आरक्षणासाठी आंदोलनाचं हत्यार उपसत आहेत. मनोज जरांगे यांची येत्या 8 जूनला बीडमध्ये अतिशय भव्य अशी सभा होणार होती. तसेच मनोज जरांगे हे 4 जूनला उपोषणाला बसणार होते. पण मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट असल्यामुळे मनोज जरांगे यांनी ही सभा पुढे ढकलली. तसेच त्यांनी उपोषणाची तारीख नव्याने जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आपण 4 जून आधीच उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान, मनोज जरांगे यांची आज तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची आज अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. मनोज जरांगे हे काही दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीवर त्यांनी सभा घेतल्या. आता त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर मनोज जरांगे यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी विशेष लक्ष ठेवून आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर याआधीदेखील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी याआधी अनेकदा उपोषणाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी सरकारला धारेवर धरलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने जरांगेंच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं. यानंतर जरांगेंवर गॅलेक्सी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. ते लवकरच बरे होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे यांचा मुंडे बंधू-भगिनीला इशारा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या दोन्ही बहीण-भावाला इशारा दिलाय. “मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ. तुला जीवे मारू, असं म्हटलं जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही, असं देखील म्हटलं जात आहे. परंतु मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावं की मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही, तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचं आहे”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. “मुंडे बहिण-भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहेत”, असा आरोप जरांगेंनी केलाय. “माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी आहे”, असंही जरांगे म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने