ब्युरो टीम : भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिंडोरीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गटावर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीनंत ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होईल. ठाकरे गट जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. त्यांना खूप दु:ख होईल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. “तुम्ही गेल्या दहा वर्षात माझं काम पाहिलं आहे. आता मी आपल्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. तिसऱ्या कार्यकाळासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. विकसित भारतासाठी आशीर्वाद मागण्यासाठी आलोय”, असं नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं.
“एनडी आघाडीला केवढं मोठं यश येत आहे याची जाणीव त्यांच्या एका बड्या नेत्याच्या वक्तव्यातून माहिती पडतं. एनडी आघाडीचा मुख्य पक्ष हा काँग्रेस आहे. काँग्रेस इतक्या वाईट पद्धतीने हारत आहे की, त्यांच्यासाठी विरोधी पक्ष होणं देखील कठीण आहे. त्यामुळे इथले जे नेता आहेत, एनडी आघाडीचे, त्यांनी सर्व छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणूक समाप्त झाल्यानंतर या सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. याचा अर्थ आपापले दुकानं बंद करायला पाहिजे. कारण त्यांना वाटतं कारण हे सर्व दुकानं एकत्र झाले तर कदाचित ते विरोधी पक्ष बनतील. त्यांची ही परिस्थिती आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
‘हा विनाश बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक दु:खी करत असेल’
“नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी यांचा काँग्रेसमध्ये विलीन होणं पक्क आहे. जेव्हा या नकली शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलीन होणार तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल. कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेना ही काँग्रेस होत आहे असं वाटेल त्यादिवशी शिवसेना संपवून टाकेल. याचा अर्थ नकली शिवसेनेचा पत्ता राहणार नाही. हा विनाश बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक दु:खी करत असेल”, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
‘हे नकली शिवसेनेवाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन…’
“नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाला चूर केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की, अयोध्येत भव्य राम मंदिराचं निर्माण व्हावं. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द व्हावं. हे स्वप्न पूर्ण झालं. पण याने सर्वाधिक चीड या नकली शिवसेनेला होत आहे. काँग्रेसने प्राण प्रतिष्ठाच्या निमंत्रणाला ठोकर मारली. नकली शिवसेनेनेसुद्धा तोच रस्ता अवलंबला. काँग्रेसचे लोक मंदिरासाठी नको त्या गोष्टी बोलत आहेत आणि नकली शिवसेना एकदम चूप आहे. त्यांची पार्टनरशिर पापाची आहे. पूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांचं पाप उघड झालंय. हे नकली शिवसेनेवाले काँग्रेसला डोक्यावर घेऊन फिरत आहे, जी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिवस-रात्र शिवीगाळ करतं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“महाराष्ट्राचा स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे जेव्हा बघते, तेव्हा महाराष्ट्राच्या लोकांचा राग येतो. पण नकली शिवसेनेला अहंकार इतका मोठा आला आहे की, त्यांना महाराष्ट्राच्या लोकांच्या भावनांची पर्वा नाही. त्यांना काही फरक पडत नाही. काँग्रेससमोर गुडघं टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचं मन पूर्ण महाराष्ट्राने बनवलं आहे. चार टप्प्यात मतदान झालं त्यामध्ये या लोकांना जनतेने चित केलं आहे”, असा दावा मोदींनी केला.
टिप्पणी पोस्ट करा