ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यादांच भारतीय जनता पक्षासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 4 जागा आल्या. यामध्येही दोन उमेदवार आयात करावे लागले. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. दरम्यान, लोकसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत, यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं आहे.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा सारासार विचार करुन आम्ही कमी जागा घेतल्या आहेत. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती, पण तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप करताना अडचणी येतात. हे विचारात घेऊन आम्ही कमी जागांवर समाधान मानले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चार जागांवर उमेदवार दिले आहेत. महादेव जानकरांची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करुन सोडली, असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेबाबत काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या. पण आता विधानसभेच्या जागावाटपात अधिकच्या जागा पदरात पाडून त्याची भरपाई करु, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता' या वृत्तपत्रास मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.
सातारच्या जागेवर आमचा दावा होता
पुढे बोलताना पटेल म्हणाले, सातारच्या जागेवर आमचा दावा होता, पण उदयनराजे भोसले यांच्यासाठी आम्ही ती जागा सोडली. पण सातारच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन भाजपने आम्हाला दिले आहे. याचाच अर्थ आम्हाला सहा जागा मिळाल्या आहेत, असं गणितही पटेल यांनी सांगितलं. मी कधीच शरद पवारांच्या विरोधात बोलणार नाही. सध्यस्थितीत शरद पवार मोठे नेते आहेत, भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल. शरद पवार यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आजही आदराची भावना आहे, असंही पटेल यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा