Prakash Ambedkar : मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का देण्यात आलं नाही?;प्रकाश आंबेडकर यांचा टोला

 

ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचं लाइव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मोदींना कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का देण्यात आलं नाही?, असा खोचक टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा खोचक टोला लगावला आहे. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही? काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची देवासोबत तुलना केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते स्वत:ला कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मोदींची ध्यानधारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे आले. काल त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यान धारणेला सुरुवात केली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या तस्वीरीसमोर त्यांनी ही साधना सुरू केली आहे. 45 तास त्यांची ध्यान धारणा असणार आहे. तर 35 तास ते मौनव्रतही करणार आहेत. या काळात मोदी अन्न घेणार नाहीत. फक्त नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस घेणार आहेत. त्यांची ही साधना 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. मोदी ज्या ठिकाणी ध्यानधारणा करत आहेत, तिथेच 1892मध्ये स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती.

आधी देवीपूजा

मोदी काल भगवती अम्मनला गेले होते. दक्षिण भारतीय पारंपारिक वस्त्र परिधान करून ते अनवाणी पावलांनी मंदिरात गेले होते. त्यानंतर त्यांनी भगवती अम्मन मंदिरात पुजाऱ्यांसोबत विधिवत पूजा केली. मंदिरात संध्याकाळी आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मंदिराची परिक्रमाही केली. यावेळी पुजाऱ्याने मोदींना अंगवस्त्र दिलं. देवीची एक मूर्तीही भेट दिली. अम्मन मंदिर हे 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. हे मंदिर सुमारे 3 हजार वर्ष जुने आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने