Ramdas Athavale : विकास या शब्दावर रामदास आठवलेंना आक्षेप ; हाच शब्द पकडत मविआ वर केली टीका

 

ब्युरो टीम : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील ‘विकास’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. त्यांच्या आघाडीतून विकास हा शब्द काढला पाहिजे. ती फक्त महाआघाडी आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एवढा विकास केल्यानंतरही ते म्हणातात विकास होत नाही. त्यांनी काहीही म्हटलं तरी जनतेला सर्व माहीत आहे. मोदींना निश्चितच विजय मिळेल, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधताना ही मागणी केली. आठवले यांनी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं. संपूर्ण देशात निवडणूक होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. बरेचशे प्रश्न प्रलंबित होते ते आम्ही पूर्ण केले. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. दक्षिण भारतातील तेलंगना आणि आंध्रप्रदेशात मी जाऊन आलो. तेलंगनात भाजपच्या चार जागा होत्या. त्या आता वाढतील. उत्तर प्रदेशात 70 ते 75 जागा मिळण्याचं टार्गेट आहे. 400 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील, असं रामदास आठवले म्हणाले.

राहुल गांधींच्या रोड शोचा खर्च…

मोदींच्या रोड शोवर किती खर्च झाला ते जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यालाही रामदास आठवले यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या रोड शोचाही खर्च काढला पाहिजे, असं आठवले म्हणाले.

मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील बॅगांवरूनही संजय राऊत यांनी आरोप केले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्यंतरी काही बॅगा आल्या. मुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती आहे. अशा पद्धतीने आपल्या विमानातून बॅगा घेऊन जातील असं अजिबात नाही. फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आरोप केला आहे. त्या बॅगांचा आणि पैसे वाटण्याचा संबंध येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी दूर करू

तिकीट न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भुजबळ साहेब नाराज असण्याचे कारण नाही. भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याचा ठरवलं होतं. त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यांची नाराजी दूर करू. ते महायुतीचा प्रचार करत आहेत, असंही आठवले म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने