Rohit Sharma : रोहित शर्माने केले हार्दिक पांड्याचं कौतुक; टी20 वर्ल्डकपमध्ये होणार मोठा फायदा

 

ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच प्लेऑफमधील स्थानही गमावलं आहे. मुंबई इंडियन्सची या स्पर्धेत सुरुवातच पराभवापासून झाली होती. पहिल्या तीन सामन्यात सलग तीन पराभव सहन केले होते. त्यानंतर सलग तीन सामने जिंकत विजयाच्या ट्रॅकवर परतली होती. मात्र त्यानंतर सलग पाच गमवल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज दिसले. मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला असला तरी उर्वरित सामने आत्मसन्मासाठी खेळत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा विजयाची चव चाखली आहे. वानखेडेवर सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने 4 षटकं टाकत 3 गडी बाद केले. त्यामुळे हैदराबादला 173 धावांवर रोखण्यात यश आलं. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूश झाला आहे. तसेच हार्दिक पांड्याचं कौतुक करण्यास विसरला नाही.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाचा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला होता. या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला गेला. मात्र फॅन्स काही ऐकण्यास तयार नव्हते. हार्दिक पांड्याला भर मैदानात हूटिंग करण्याची संधी सोडत नव्हते. इतकंच काय तर हार्दिक आणि रोहित मैदानात एकमेकांपासून लांबच असायचे. या सर्व बाबींचा नकारात्मक प्रभाव मुंबई इंडियन्सच्या खेळीवर पडला.  असाच काहीसा परिणाम टी20 वर्ल्डकपमध्ये होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पण रोहित शर्माच्या एका शाबसकीने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माकडून शाबसकीची थाप 16व्या षटकात आली. हैदराबादचा अष्टपैलू शहबाज अहमद आणि मार्को यानसेन पार्टनरशिप वेगाने करत होते. तेव्हाच ही जोडी हार्दिक पांड्याने तोडली. या महत्त्वाच्या योगदानासाठी रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याची ही बॉन्डिंग टीम इंडियासाठी टी20 वर्ल्डकपमध्ये फायदेशीर ठरू शकते. दोन्ही खेळाडू भारतीय संघाचा कणा आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. हार्दिक पांड्याचा फॉर्म मागच्या 4 सामन्यात दिसून आला आहे. त्याने 4 सामन्यात एकूण 7 गडी बाद केले आहेत. त्याने पॉवर प्ले, मिडल ओव्हर आणि डेथ ओव्हरमध्येही विकेट घेतले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने