ब्युरो टीम : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याची चर्चा होती. आता मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोण आहेत सोनिया दुहान ?
सोनिया दुहान या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. पक्षाच्या प्रवक्त्या म्हणूनही त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम केले आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या सक्रिय झाल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.
8 तासांपूर्वी सोनिया दुहान यांच्याकडून इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन
8 तासांपूर्वी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सोनिया दुहान यांच्याकडून इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व मतदारांना सांगू इच्छिते की, मतदानाचा हक्क बजावा. स्वत:ही इंडिया आघाडीला मतदान करा. शिवाय आपल्या कुटुंबियांनाही इंडिया आघाडीला मतदान करण्यास सांगा. देशात लोकशाही आणि संविधान शाबूत ठेवण्यासाठी ही शेवटची संधी आहे.
धीरज शर्मांकडून पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट युवक आघाडीचे अध्यक्ष धीरज शर्मा यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. धीरज शर्मा यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. फेसबुकवर पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा