AFG vs AUS T20 World Cup : अफगाणिस्तानने घेतला बदला, ऑस्ट्रेलियावर मिळवला ऐतिहासिक विजय



ब्युरो टीम : अफगाणिस्तानने सुपर-8 च्या मॅचमध्ये धडाकेबाज कामगिरी करत इतिहास रचला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 21 धावांनी पराभव केला आहे. 

अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये मोठा दणका दिला आहे. त्यांनी 7 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन टीमचा पराभव केला आहे. सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर सर्वबाद झाला.

कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कांगारू संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ते ऑलआऊट झाले. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करताना 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.

दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या होत्या. यादरम्यान सलामीवीर गुरबाजने 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. इब्राहिम झद्रानने 51 धावांची खेळी केली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 3 बळी घेतले. ॲडम झाम्पाने 2 बळी घेतले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने