ब्युरो टीम : रुपेरी पडद्यावर अभिनेता-अभिनेत्रींच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हिंदीसह मराठीतही अशाच काही लोकप्रिय जोड्या आहेत. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय जोडी असणारी अजिंक्य देव आणि अश्विनी भावे ही जोडी पुन्हा झळकणार आहे. तब्बल 25 वर्षांनी हे दोघेही एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. 'घरत गणपती' या चित्रपटातून हे दोघे दिसणार आहेत.
मराठीमधील पॉलिटिकल-थ्रिलर चित्रपट 'सरकारनामा' नंतर हे दोघेही ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव आणि अश्विनी भावे एकत्र येत आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव हा शरद घरत आणि अश्विनी भावे ही अहिल्या घरतची व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटात अजिंक्य देव हा कुटुंबवत्सल पती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहे.
‘शाब्बास सूनबाई’,‘मायेची सावली’,‘चल गंमत करू’, ‘सरकारनामा’ या चित्रपटांद्वारे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावर चांगलीच खुलली होती. आता 25 वर्षांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देव आणि अश्विनी भावे एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. रुपेरी पडद्यावरील आमची केमिस्ट्री रसिकांना आनंद देईल,चित्रपटाचा सुंदर विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला. श्री गणराया’च्या आगमनाच्या निमित्ताने घरत कुटुंबातल्या अनुबंधाची हलकी-फुलकी गोष्ट ‘घरत गणपती’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.
पॅनोरमा स्टुडिओज आणि नॅविअन्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘घरत गणपती’ हा चित्रपट 26 जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर यांचे असून कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नम्रता बांदिवडेकर, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘घरत गणपती’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'घरत गणपती'
निकिता दत्ता, भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, डॉ.शरद भुताडिया, सुषमा देशपांडे, परी तेलंग,आशिष पाथोडे, रूपेश बने, राजसी भावे, समीर खांडेकर, दिव्यलक्ष्मी मैस्नाम अशी कलाकार मंडळी या चित्रपटात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा