ब्युरो टीम : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींच्या देशातील राजकीय घडामोडींवर काही परिणाम होतो का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण अरुणाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या घडामोडींचा फार फरक पडलाय असं म्हणता येणार नाही. देशात नुकतंच लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं. या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं. त्यानंतर लगेच विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेच्या आधारावर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. या अंदाजात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. अजित पवार गटाचा सुफडा साफ होईल, असं भाकीत वर्तवलं आहे. असं असताना अरूणाचल प्रदेशमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश आलं आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात 19 एप्रिलला विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीच्या निकालाचे आकडे आता समोर येत आहेत. या निकालानुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरूणाचल प्रदेशमध्ये एन्ट्री झाली आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2 उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय. तर 3 उमेदवार जिंकून आले आहेत.
अरूणाचल प्रदेशमध्ये भाजप पुन्हा सत्तेत
अरूणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता इथे पुन्हा भाजपचं सरकार येणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने 47 जागांवर यश मिळवलं आहे. तसेच भाजपने याआधीच 10 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 41 जागा जिंकल्या होत्या. आता तोच आकडा 47 वर आला आहे.
महाराष्ट्रात शरद पवार गटाला भरघोस प्रतिसाद?
अरूणाचल प्रदेशात अजित पवार गटाला यश मिळत असलं तरी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाबाबत वर्तवण्यात आलेला अंदाज वेगळा दिसतोय. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, अजित पवार गटाला महाराष्ट्रात एकाही जागेवर यश मिळणार नाही, असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या गटाला तब्बल 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ 3 खासदार निवडून आले होते. आता शरद पवार गट 6 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा