ब्युरो टीम: 'राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा. तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या,' असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले.
पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले आदी उपस्थित होते. तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मनियार, नाशिक विभागाच्या उपायुक्त राणी ताटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, कृषी सहसंचालक रावसाहेब भाबडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस पडला नसलेल्या ठिकाणी चांगला पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या समन्वयाने जनजागृती करावी,' असेही त्यांनी यावेळी सांगितले.
धरणातील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन हवे
'हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्यीय धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे. पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. आलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही सतर्क राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी, ' असे निर्देशही पवार यांनी दिले.
नागरिकांना वेळेवर सूचना द्या
'पाऊसमान चांगले असल्यामुळे पाणी तुंबणे, अनियंत्रित विसर्गामुळे पूर येणे आदींबाबत यंत्रणांनी काळजी घ्यावी. पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूर्वसूचना देऊन सतर्क करावे. अशा परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याचा, वेळेवर मदत व पुनर्वसनाचे सर्व उपाय योजण्याचा प्रयत्न करावा. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात,' असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी आपआपल्या विभागातील पाऊस, धरणातील जलसाठा, खरीप हंगामाचे नियोजन, तर पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी यासोबतच आषाढी वारीच्या नियोजनाबबात माहिती दिली. आषाढी वारीसाठी मंजूर निधी ताबडतोब वितरित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
टिप्पणी पोस्ट करा