ब्युरो टीम : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार की छगन भुजबळ ?, यावर अजित पवारांची राष्ट्रवादी पेचात पडलीय. अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंमध्ये तासभर बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पण त्याचवेळी भुजबळांचा फोन आला. राज्यसभेसाठी आपणही इच्छुक असल्याचं भुजबळांनी सांगितल्याचं सूत्रांकडून समजतंय. त्यानुसार पुन्हा अजित पवार आणि तटकरेंमध्ये चर्चा झाली. आता सकाळपर्यंत नाव निश्चित होईल. तसं तर तटकरेंची पत्रकार परिषद राज्यसभेच्या उमेदवारी घोषित करण्यासाठीच होती. पण ऐनवेळी भुजबळांची एंट्री झाल्यानं, घोषणाला रात्रभर लांबवण्याचं ठरलं.
फेब्रुवारीतच राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात प्रफुल्ल पटेलांचा राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असतानाही नव्यानं त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनही आले. त्यामुळं आधीच्या रिक्त जागेवर आता निवडणूक होत असून त्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार आणि भुजबळांमध्ये स्पर्धा असल्याचं समजतंय.
अजित पवार धर्मसंकटात
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. सुप्रिया सुळेंना 7 लाख 32 हजार 312 मतं मिळाली. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना 5 लाख 73 हजार 979 मतं मिळाली. तब्बल 1 लाख 58 हजार 333 मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
बारामतीत लोकसभेत पराभूत झाल्यानं, राज्यसभेवर सुनेत्रा पवारांना खासदार करा, असा एक मतप्रवाह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. तर खासदारकीसाठी छगन भुजबळही आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून दिल्लीतल्या भाजपच्या श्रेष्ठींकडूनच माझ्या नावाची चर्चा होती, असं भुजबळ म्हणाले होते. मात्र नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं न सोडल्यानं भुजबळांना तिकीट मिळालं नाही. एकीकडे पत्नी आणि दुसरीकडे पक्षातले ज्येष्ठ नेते, असं धर्म संकट अजित पवारांसमोर आहे. आता कोणाची निवड होऊन, राज्यसभेची खासदारकी कोणाला मिळेल, हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होईल.
टिप्पणी पोस्ट करा