Balasaheb Thackeray Smarak : मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे होणार उद्घाटन ; उद्धव ठाकरेंनी सांगितली तारीख ?

 

ब्युरो टीम : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून दादरमधील महापौर निवासस्थानाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या कामाची शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्यानंतर हे काम कधी पूर्ण होईल अन् स्मारक राज्यातील जनतेसाठी कधी सुरु होणार? त्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पुढील वर्षी २३ जानेवारी रोजी जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे गेल्या तीन महिने स्मारकाकडे येता आले नाही. परंतु या तीन महिन्यांत कामाची चांगली प्रगती झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, स्मारकाचे बांधकाम जवळपास जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतर खरे काम सुरु होणार आहे. इंटरिअरचे हे काम असणार आहे. त्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्ण जीवनप्रवास देण्यात येणार आहे. आमचा प्रयत्न २३ जानेवारी २०२५ पर्यंत हे स्मारक जनतेसाठी आणि शिवसैनिकांसाठी खुले करावे.

समुद्रामुळे बांधकामास अडचणी

बाळासाहेबांचे स्मारक असलेल्या जागेजवळ समुद्र आहे. त्यामुळे पाण्याचा रेटा प्रचंड येत असतो. त्या अडचणींवर मात करत काम झाले आहे. अजून काही बारीक सारीक गोष्टी अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु स्मारकाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. स्मारकाचे काम दोन टप्प्यात होत आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधण्यात येणार आहे.

राज्यातील जनतेने माहिती द्यावी

बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यातील जनतेकडे जी माहिती असेल ती त्यांनी शिवसेना भवन किंवा स्मारकावर आणून द्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. बाळासाहेबांचे फोटो, लेख, बातम्या किंवा बाळासाहेबांचा जीवनप्रवास दाखवणारी इतर कोणतीही माहिती द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने