Breaking : धक्कादायक! तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू



ब्युरो टीम : तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यात बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विषारी दारू प्यायल्याने या २९ जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.


तामिळनाडूच्या कल्लाकुरीची जिल्ह्यातून बुधवारी रात्री मोठ्या संख्येने रुग्ण उलट्या आणि इतर तक्रारींसाठी कल्लाकुरीची रुग्णालयात दाखल झाले. त्याव्यतिरिक्त विल्लुपुरम, सालेम आणि पुदुच्चेरी या भागातील रुग्णालयांमध्येही अशाच प्रकारचे रुग्ण दाखल झाले. या रुग्णांची तपासणी केली असता त्यांनी विषारी दारू प्यायल्यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज रुग्णालयाकडून व प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कल्लाकुरीची जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. एस. प्रशांत यांनी माध्यमांना ही माहिती दिली.


दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेचा आपल्याला धक्का बसल्याचं म्हटलं आहे. “कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचं वृत्त ऐकून मला धक्का बसला असून प्रचंड दु:ख झालं आहे. या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच, हा प्रकार होण्यासाठी जे कामचुकार अधिकारी कारणीभूत होते, त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे”, असं स्टॅलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये स्टॅलिन यांनी सविस्तर निवेदनही शेअर केलं आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने