Crime : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने महानगर पालिकेचे दालन केले सील; प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचखोरीचे आरोप

 

ब्युरो टीम : लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या नाशिक येथील पथकाने आज अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचे दालन सील करण्यात आले आहे. त्यांच्या घराचीही तपासणी करण्यात येत असून नगरचना विभागातील अधिकाऱ्यांकडेही यासंबंधी चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. नगरमधील नगररचना विभागाशी संबंधित तक्रार मिळाल्याने ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. यासंबंधी अधिक माहिती देण्यासही पथकातील अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. नगर आणि नाशिकमध्येही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महापालिकेत दोन दिवसांपासून गोपनीय पद्धतीने कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयुक्तांचे दालन सील केले. मनपाच्या नगर रचना विभागातील एकाला ताब्यातही घेतल्याचे सांगण्यात येते. महापालिकेत दोन दिवसांपासून गोपनीय पद्धतीने कारवाई सुरू असल्याचीही चर्चा होती. नगरमधील नगर रचना विभागातील अनियमितता आणि लाचखोरीसंबंधीची तक्रार नाशिकला करण्यात आल्याने त्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यात बडे अधिकारीच अडकल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.

अन् महापालिकेत काहीतरी झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला...!

मनपाच्या बहुतांश अधिकार्‍यांचे मोबाईल गुरुवारी स्वीचऑफ होते. त्यामुळे नेमके काय झाले, याची उत्सुकता शहरभर होती. मनपाच्या नगर रचना विभागातून दोनजण ताब्यात घेतल्याचेही सांगितले जाते. दुपारी पथकाने आयुक्तांच्या दालनाबाहेरील स्वीय सहायकाने खोलीतील सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर आयुक्तांचे दालन सीलबंद केले. या कारवाईमुळे महापालिकेत काहीतरी झाल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला.

पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल नाही

नगर रचना विभागातून ताब्यात घेतलेल्या एकाकडे चौकशी सुरू असून त्याने मनपातील दोन-तीन बड्या अधिकार्‍यांची नावे घेतल्याचे समजते. बहुदा यामुळेच आयुक्तांचे दालन सील केले गेले असल्याचा अंदाज असला तरी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही किंवा अधिकृत माहितीही समोर आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने