ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभेच्या जागा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करुन एक विधानसभेचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर घडू येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. पण या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला देखील जबरा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.
पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 105 आमदारांपैकी 42 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ भाजपला केवळ 62 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांपैकी 14 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मविआ आघाडीवर आहे. याचाच अर्थ शिंदे गटाला पोलनुसार केवळ 26 जागांवर यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 40 आमदारांपैकी 25 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे. त्यामुळे अजित पवार गटाला केवळ 15 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबतची आकडेवारी धक्कादायक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला सपशेल नाकारल्याचा शिक्का विधानसभेतही मारला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षात पुकारलेल्या बंडामुळे दोन्ही पक्षांचे दोन-दोन तुकडे झाले. पण हीच विभागणी मतदारांना रुचली नसल्याचं पोलचे आकडे सांगत आहेत.
महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार?
टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 158 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला केवळ 127 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटात सध्या 15 आमदार आहेत. हीच संख्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर दुप्पट होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 30 आमदार जिंकून येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे सध्या 45 आमदार आहेत. या आमदारांची संख्या विधानसभा निवडणुकीनंतर 27 आमदारांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही थेट 72 वर जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे सध्या 12 आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तब्बल 40 आमदार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे 52 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा