ब्युरो टीम : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणीदेखील केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती असलेले मंत्री हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या चर्चांवर अखेर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. “याबाबतच्या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही की, उपमुख्यमंत्री होणार, गृह खातं कुणाला मिळणार, कोणतं खातं कुणाला मिळणार? यामध्ये कुठलंही तथ्य नाही. ही बातमी निराधार आहे”, असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.
“परवाच ज्यावेळेला कोअर कमिटीची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मी पराभवाचा स्वीकार करतो. इथपर्यंत ठीक होतं. नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की, मी सरकारमधून बाहेर पडतो आणि संघटनेचं काम करतो. मी तीन महिन्यात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो. पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन खुलासा देखील केला आहे. आम्ही सांगितलं आहे की, देवेंद्र फडणवीस हे संघटनेचंही काम करतील आणि सरकारमध्येही राहतील. त्यांनी कुठलाही राजीनामा देण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही सर्व याच मतावर ठाम आहोत”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.
‘आम्ही याबाबतीत पक्षश्रेष्ठींना सांगणार’, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
“देवेंद्र फडणवीस आज अमित शाह यांना दिल्लीत भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली ते माहिती नाही. पण आम्ही याबाबतीत पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत. आम्ही पंतप्रधानांच्या शपथविधीला जाऊ तेव्हा पक्षश्रेष्ठींची वेळ घेऊ. त्यावेळी आम्ही आमच्या भावना सांगू. देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज नाही. ते सक्षम आहेत. ते संघटनाही सांभाळू शकतात आणि सरकारमध्येही राहू शकतात”, असं गिरीश महाजन म्हणाले. “गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार, त्यांना गृमंत्रीपद मिळेल का? या बातम्यांना कुठलाही आधार नाही”, असं देखील ते पुन्हा म्हणाले.
“आम्ही तीन महिन्यांचा रोड मॅप तयार करणार आहोत. येणारे तीन महिने आम्ही खूप काम आणि कष्ट करणार आहोत. आमचं टीमवर्क आहे. अपयश आलं ते केवळ देवेंद्र फडणवीस यांचं एकट्याचं अपयश नाही. शेवटी हे टीमवर्क आहे. आम्ही कोअर कमिटीचे एवढे सदस्य आहोत, मंत्री आहोत. आम्हीसुद्धा तेवढेच जबाबदार आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीसाठी राजीनामा देण्याची काहीच गरज नाही, असं माझं मत आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा