ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज, सोमवारपासून सुरू होत आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. हे १८ व्या लोकसभेचे अधिवेशन असणार आहे.
अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनावर हंगामी लोकसभा अध्यक्षपदाची शपथ दिली जाईल. सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृह नेते या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वप्रथम शपथ दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रपतींनी हंगामी अध्यक्षांच्या मदतीसाठी नेमलेल्या समितीसदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर मंत्रिपरिषदेचे सदस्य आणि शेवटी आद्याक्षरांच्या क्रमानुसार प्रत्येक राज्यातील सदस्याला शपथ दिली जाईल. २६ तारखेला लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.
असे आहे अधिवेशनाचे वेळापत्रक:
२४ जून, सकाळी ११ वा. : संसद अधिवेशनाला सुरुवात
२४ आणि २५ जून : सदस्यांचा शपथविधी
२६ जून : लोकसभा अध्यक्षांची निवड
२७ जून : राष्ट्रपतींचे अभिभाषण
२८ जून : राष्ट्रपतींचे आभार मानणारा प्रस्ताव
२ किंवा ३ जुलै : प्रस्तावाला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर
(त्यानंतर अधिवेशनाला काही दिवसांची सुट्टी असेल.)
२२ जुलै रोजी अर्थसंकल्पासाठी पुन्हा अधिवेशन सुरू होईल.
टिप्पणी पोस्ट करा