Maharashtra Loksabha : महाराष्ट्रात भाजपला सामजिक ध्रुवीकरणाचा फटका

 


    ४ जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला. भाजपाला देशभर अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले यात भाजपला  महाराष्ट्र व उत्तर प्रदेश याठिकाणी मिळालेले अपयश याचा वाटा जास्त प्रमाणात आहे. आता केंद्रात मोदी सरकार बनले असले तरी येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकसभेतील निकालांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास महाराष्ट्रात भाजपला मिळालेले अपयश याचे विश्लेषण आपल्याला पुढील प्रमाणे करण्यात येईल.
 
    भाजपने ही निवडणूक मोदी व विकास या नेरेटीव भोवती लढविण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे स्थानिक मुद्दे मागे पडतील असा भाजपा मधील नेत्यांना विश्वास होता. परंतु महाराष्ट्रात सत्ताविरोधी भावना होती आणि ती या लोकसभा निकालांमध्ये दिसून आली. भाजपचे बरेच विद्यमान खासदार सामान्य नागरिकांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने स्थानिक नागरिक विद्यमान खासदार यांच्या विरोधात होते याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसलेला दिसतो.

    महाराष्ट्रातील किमान ५५% ग्रामीण भाग आणि कृषीक्षेत्र राज्यातील राजकारणाचा आलेख मांडण्यात अग्रेसर आहे. पश्चिम महाराष्ट्रात साखर उत्पादक शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन, आणि उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. यापुर्वी विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या  याची संख्या वाढते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप दिसून आला. शिवाय, कांद्यावर ४०% शुल्क लावण्याचा केंद्राचा निर्णय आणि त्यानंतर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णयही वेळेत न आल्याचा फटका भाजपाशासित युतीला बसला. उत्तर महाराष्ट्रातील कांदा पट्ट्यात, निर्यात बंदी आणि कांद्यावर लादलेले शुल्क अधिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता याचा फटका भाजपला बसल्याचे दिसले. 

    भाजपच्या अपयशाला काही सामजिक गणिते देखील कारणीभूत ठरल्याचे दिसून आले यात मराठवाडा भागात मराठा आरक्षण आंदोलनामुळे मतदानामध्ये तीव्र ध्रुवीकरणाचा परिणाम भाजपच्या निवडणुकीच्या भवितव्यावर झाला, विशेषत: मराठवाडा भागात. महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देऊनही हा प्रकार घडला. याच प्रमाणे मुस्लीम व वंचित मतदारांचे एकत्रीकरण याचा फायदा महाविकास आघाडीला झालेला दिसला.   
    लोकसभा निवडणूकीसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या कामात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) या महायुती मधील कार्यकर्त्यानमध्ये सहकार्याचा अभाव हे देखील अपयशाचे कारण ठरले. भाजपाचा मित्रपक्ष असलेला अजित पवार गटाच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदार संघातून निवडून येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या युतीतून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. असे चित्र आहे. 

    शिवसेना आणि एनसीपी याच्यात फुट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी विभागणी झाली. प्रमुख पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह देखील याच दोन गटांना देण्यात आले. सामान्य नागरिकांना ही बाब फारशी आवडली नाही. त्यामुळे कदाचित या सहानुभूतीचा फायदा सेना आणि राष्ट्रवादीच्या मूळ नेत्यांना अर्थात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लाभलेला दिसतो.

    लोकसभेच्या निकालाचा अर्थ काढायचा झाल्यास अजित पवारांना बरोबर घेणे भाजपच्या पारंपारिक मतदाराला अजून पचलेले दिसत नाही. भाजपचा मूळ मतदार असा आहे, कि ज्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा पटत नाही. ते भाजपाला हिंदुत्वासाठी मत देतात. परंतु भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विचारसरणी असलेल्या लोकांना घेऊन त्यांच्या निष्ठावान असलेल्या मतदाराला दुखावले असे या निकालावरून दिसते. दूसरा मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुद्धा एक मतदार आहे, जो कि हिंदू आणि बाळासाहेबांवरच्या प्रेमाखातीर शिवसेना - भाजप युतीला मत देतो. परंतु या मतदाराला सुद्धा शिवसेना फोडून नाराज करण्यात आले याचा तोटा भाजपला झाल्याचे दिसते.

    उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्या सोबत महाआघाडीची स्थापना करून, त्याचे मुस्लिम मत आपल्या कडे फिरवली, परंतु अजित पवार यांच्याशी गटबंधन करून सुद्धा भाजपाला त्यांच्या मतांचा कुठे फायदा झालेला दिसून आला नाही. लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाकडून २१ जागांवर उमेदवारांनी लोकसभेसाठी लढत दिली त्यापैकी ९ जागांवर त्यांनी विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेने १५ जागांवर आपला उमेदवार उभा केला होता त्यापैकी ७ जागा जिंकता आल्या. शरद पवार साहेब यांनी पुन्हा शीर्षस्थानी झेप घेत, १० पैकी ७ जागा जिंकत पुन्हा अव्वल स्थान पटकावले तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांनी लढलेल्या पाचपैकी फक्त १ जागा जिंकता आली. कॉंग्रेसला या निवडणुकीत सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसून येत असुन त्यांनी १३ जागांवर मिळालेले यश हे त्यांचा परंपरागत मतदार हा परत त्यांच्याकडे वळलेला दिसतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने