Mahayuti : महायुतीचे जागावाटपाचे सूत्र ठरले? प्रत्येकी मिळणार एवढ्या जागा

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकी दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीत उमेदवार निश्चित झाले नव्हते. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्षांना बसला. त्या निकालापासून धडा घेत महायुतीने विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा सुरु केली आहे. या प्राथमिक चर्चेनुसार, सर्वाधिक जागांवर भाजपने दावा केला आहे. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचा क्रमांक आहे. या जागा वाटपावरील चर्चेत मित्रपक्षांचाही विचार करण्यात आला आहे. छोट्या मित्र पक्षांसाठी महायुतीने १५ जागा सोडण्याची तयारी केली आहे. तसेच काही जागा महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनाही देण्यात येणार आहे.

असे आहे सूत्र

महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चा सुरु केली आहे. या प्राथमिक चर्चेनुसार भाजप १५५ जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच ६०-६५ जागांवर शिवसेना आपले उमेदवार देणार आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेससाठी ५०-५५ जागा सोडण्याचा विचार सुरु आहे. महायुतीत तीन लहान मित्र पक्षही आहे. त्यांच्यासाठी १५ जागा सोडण्यात येणार आहे.

यामुळे सुरु केली विधानसभेची तयारी

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता महायुती विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? याची कारणे शोधली जात असताना विधानसभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. लोकसभेतील पराभवावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे कान टोचले आहे. संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपला ‘अहंकारी’ म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने