ब्युरो टीम : ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्याचा अध्यादेश काढण्याला मनोज जरांगे यांनी राज्य शासनाला १३ जुलैपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. विहित वेळेत जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत, असे जाहीर करून त्याअनुषंगाने १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्याचवेळी मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, असे जरांगे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने मनोज जरांगे यांनी ८ जूनपासून उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने १३ जून रोजी आश्वासन देऊन एक महिन्याची मुदत मागितली. त्यानुसार जरांगे यांनी महिनाभराची वेळ देऊन उपोषण स्थगित केले आणि त्यानंतर प्रकृती स्वास्थ्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. बुधवारी (१९ जून) जरांगे यांनी 'एपीबी माझा'ला विशेष मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केल्याचा गौप्यस्फोट करून प्रस्थापित राजकारण्यांच्या मनात धडकी भरवली.
स्वत:चा पक्ष काढायचा की उमेदवार अपक्ष उभे करायचे याबाबतचा निर्णय घेतला नाही
सरकारने ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण दिले नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आमचा १२७ जागांवरील पहिला सर्व्हे पूर्ण झालेला आहे. स्वत:चा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष उमेदवार असणार, याबाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. परंतु वेळ पडली तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढविणार, असे जरांगे यांनी सांगितले. त्याचवेळी आपण स्वत: निवडणुकीच्या रिंगणात नसू, हे स्पष्टपणे जरांगे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा