MNS-BJP : विधानसभेसाठी मनसेकडून भाजपसोबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरु ; २० जागांची मागणी केल्याची चर्चा

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष पुढील ४ महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवर लागले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे, आणि अजित पवार यांची विधानसभेसाठी काय रणनिती असेल याची चर्चा सुरू आहे. अशात लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी राज्यातील महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकी संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता तसेच काही ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे. मनसेने राज्यात २० जागा मागितल्या असून यातील अधिकतर जागा मुंबई आणि उपनगरातील आहेत.

मनसेकडून मागण्यात आलेल्या जागांमध्ये वरळी, दादर-माहिम, शिवडी, मगाठाणे, दिंडोरी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रा आणि पुण्यातील एक जागेचा समावेश आहे. मनसेकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. दादर-माहिम मतदारसंघातून नितिन सरदेसाई तर वर्सोवामधून शालिनी ठाकरे निवडणूक लढवू शकतात.


मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी मिशन महाराष्ट्र हाती घेतले आहे. यासाठी १३ जून रोजी मुंबईत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. अशाच पक्षाकडून भाजपसोबत जागावाटपाची बोलणी सुरू असल्याचे समोर येत आहे. अर्थात याबाबत अधिकृतपणे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, भाजपकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ज्या राज्यांत झटका बसला आहे त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. येथे पक्षाच्या जागा २३ वरून ९ इतक्या झाल्या आहेत. त्यामुळे भाजपसाठी ४ महिन्यावर आलेल्या विधानसभेसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.

भाजपने १४ जून रोजी मुंबईत जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे नेते मार्गदर्शन करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने