Nana Patole : मनाची असेल तर पाय धुवून घेऊ नका, पायउतार व्हा, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वर्तणुकीवर सर्वच स्तरातून हल्लाबोल

 

ब्युरो टीम : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा वादात अडकले आहे. त्यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. लोकसभा निकालाच्या संदर्भातून राजकीय नेते त्यांच्यावर तिखट हल्लाबोल करत आहे. लोकसभेतील निकालामुळे ते हुरळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. काहींनी त्यांना स्वतःला संत समजू नका, असा टोला हाणला आहे. काय आहे हा वाद आणि कशी बसली त्याला फोडणी?

अकोला जिल्ह्यातील घटना

नाना पटोले हे अकोला दौऱ्यावर होते. वाडेगाव येथे एका कार्यक्रामासाठी सोमवारी ते आले होते. संत श्री गजानन महाराजांची पालखी वडेगाव येथे मुक्कामी होती. पटोले यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर वाढदिवसानिमित्त पटोले यांची लाडूतूला करण्यात आली. या कार्यक्रमात निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले.

कार्यकर्त्याने धुतले पाय

वडेगाव येथे पाऊस पडला होता. नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे चिखल झाला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पण इतर भाविकांप्रमाणे चिखलातून वाट काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. मैदानावरील चिखलाने पटोले यांचे पाय मातीने माखले. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी वाहनाकडे गेले. पाय चिखलाने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. त्यावेळी त्यांच्या वाहनाजवळ आलेल्या कार्यकर्त्याने पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय धुतले. या कृतीमुळे एकच वाद उफाळला आहे.

ते स्वतःला देव समजताय काय?

या प्रकारामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. त्यांनी नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केला. केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर प्रहार केला. नाना स्वतःला देवच समजायला लागले काय? असा चिमटा त्यांनी काढला. जनाची नाही, मनाची असेल तर पाय धुवून घेऊ नका, पायउतार व्हा, असा टोला त्यांनी लगावला.

नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल

या कार्यकर्त्याच्या जीवावर नेता घडत असतो त्याच्याकडून असे कृत्य करून घेणाऱ्याचा मी धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. राज्याच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम सुरू आहे. थोडेसे यश मिळाल्याने हा माज दिसून येतो. सरंजामशाही वृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम आहे. नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला हवा. नाना पटोले याना एवढीच हौस आहे तर त्यांनी बुवा बाजी करावी नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा नंतर त्यांनी कुठल्याही पद्धतीचे भाष्य करावे. नाना पटोले यांच्या मग्रुरीचा जाब कार्यकर्ता विचारेल अशी प्रतिक्रिया दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने