Pandharpur Wari : जाणून घ्या वारीचा इतिहास...

 


    सर्वसामान्यांच्या अंतःकरणाला भिडणाऱ्या भाषेतील उपदेशामुळे, तसेच शुद्ध आचरण चारित्र्य, समानता यांच्या पुरस्काराने भागवत पंथ लोकप्रिय झाला. अध्यात्मातील परब्रह्म विठ्ठलाच्या रूपाने उभे आहे, ही वारकऱ्यांची दृढश्रद्धा, ज्ञानेश्वरांनी वारकऱ्यांतील हिंदू संस्कृतीचा, पंथाचा पाया मजबूत केला आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. भागवत संप्रदायाने अठरापगड जातीच्या विठ्ठल भक्तांना उच्च विचारांची बैठक देऊन, समान दर्जा देऊन भागवत धर्माच्या झेंड्याखाली उद्धाराच्या भक्तिमार्गात सामावून घेतले.

    वारीचा इतिहास पाहता श्री कृष्ण हे वैकुंठातून किंवा गोकुळातून किंवा द्वारकेतून पंढरपूरला आले हे सर्व संत मान्य करतात. पंढरपूरची वारी श्री ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चालत असावी. त्याचे लिखित पुरावे मात्र ज्ञानदेवांच्या काळानंतर सापडतात. संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनच पंढरपूरची वारी चालत असल्याचा उल्लेख आपल्या ग्रंथात केला आहे यावरून वारकरी संप्रदायाचा इतिहास 12 व्या शतकापर्यंत मागे जातो.

    भक्त पुंडलिकाचा काळ संप्रदायामधे प्रचलित आख्यायिकेनुसार संप्रदायाची सुरवात ही भक्त पुंडलिकापासून झाली. पुंडलिकाने आईवडिलांच्या केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पंढरपूर इथे आले ही गोष्ट प्रसिद्ध आहे. 'पुंडलिक वरदा श्रीहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय' ही वारकऱ्यांची घोषणा आहे. याचा अर्थ पुंडलिकाला वरदान देणाऱ्या हे श्री हरी विठ्ठला असा आहे. शंकराचार्यांनी लिहिलेल्या स्तोत्रावरून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र सातव्या शतकात प्रसिद्ध होतं असं म्हणता येते, अर्थात या स्तोत्रामधे वारीचा अथवा संप्रदायाचा उल्लेख नाही. या भक्तीस तात्त्विक जोड ज्ञानदेवापासून पुढील संतांनी दिली. संत ज्ञानदेव – नामदेवांपासून पुढचा इतिहास काळासहित सांगता येतो. त्याचं अत्यंत मार्मिक वर्णन बहिणाबाईंनी पुढील अभंगात केलं आहे.

संतकृपा झाली। इमारत फळा आली।।

ज्ञानदेवे घातला पाया। उभारिले देवालया।।

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।

जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।

बहेणी फडकते ध्वजा। निरुपण आले ओजा।।

    "ज्ञानदेवे रचिला पाया" असें संत बहिणाबाईनी म्हंटले आहे. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला याचा अर्थ त्यांनी या प्रदायाला आरंभ केला नसून, त्यांच्या हातून त्या संप्रदायास स्थैर्य लाभले, असाच कला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी 'मेळविली मांदी वैष्णवांची' असे तुकारामांनी म्हंटले आहे. या संप्रदायाला ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं एक अधिष्ठान आणि तत्वज्ञान दिलं. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची स्वतःची कीर्तनपद्धती निर्माण केली. ज्ञानदेवांच्याही आधी पंढरपुरात यात्रा भरत होती. या संदर्भात संत नामदेवांचा अभंग पुढीलप्रमाणे आहे.

"आषाढी कार्तिक विसरु नका मज। सांगतसे गुज पांडूरंग।"

    पंढरी क्षेत्राचं, संतांचं माहात्म्य सांगितलं. संप्रदायाचा प्रसार पंजाबपर्यंत केलाच याशिवाय विविध संतांची चरित्रं आणि आत्मचरित्र लिहून एकप्रकारे डॉक्युमेंटेशन केलं. ज्ञानदेव – नामदेव काळात संत गोरोबाकाका,सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी महाराज, सेना महाराज, जनाबाई,मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानकाका,सोयराबाई, विसोबा खेचर,चांगदेव, परिसा भागवत, बंका महाराज आणि इतरही महत्त्वाची संत मंडळी होती.त्यानंतर मधल्या कालखंडात संत कान्होपात्रा आणि संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास हे संत होऊन गेले.

    विठ्ठलभक्तीची पार्श्वभूमी पाठीशी असल्यामुळे, एकनाथां च्या हातून वारकरी संप्रदायाच्या संदर्भातही भरीव कामगिरी घडून आली. गीतेचा अर्थ मराठीत सांगून तो सर्वसामान्यांपर्यं त पोहोचविण्याची कामगिरी ज्ञानेश्वरांनी केली. त्याचप्रमाणे नाथांनी भागवतपुराण मराठीत आणण्याचा उद्योग केला. ह्या उद्योगास पैठणच्या तसेच काशीच्या सनातनी विद्वानांचा असलेला विरोध नाहीसा करून नाथांनी एकनाथी भागवत काशीतच पुर्ण केले.

हे देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी ।

हे टीका तरी मराठी । ज्ञानदाने होईल लाठी ।।

    असे उद्‌गार नाथांनी एकनाथी भागवतात काढलेले आहेत. त्याचप्रमाणे ‘संस्कृत भाषा देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली?’ असा सवालही त्यांनी विचारला आहे. तथापि एकनाथांनी संस्कृतचा अनादर कधीच केला नाही. उलट त्या भाषेतील शब्दांचे ऐश्वर्य मराठीला श्रीमंत आणि भारदस्त करण्यासाठी त्यांनी उपयोगात आणले कटुता आणणारा अभिनिवेश न बाळगता नव्याजुन्यांचा मेळ घालण्याची जी शक्ती नाथांच्या ठायी होती, तिच्यामुळेच सनातन्यांना न दुखविता ते त्यांच्या सद्‍भावनेस हात घालू शकले.

    वारकरी संतां नी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापी आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली . देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।

ह्या तुकोबांच्या उक्तीमध्ये ही अभेदभावाची भूमिकाच स्पष्ट झालेली आहे.

    वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही. ‘ तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात ‘ ही तुकारामांची उक्ती प्रसिद्ध आहे.

    भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. समाजधारणेला पोषक होणारी कर्मे सोडण्याचा उपदेश ह्या संप्रदायाने आपल्या अनुयायांना कधीच केला नाही. कर्मबंधनाची यातायात टाळण्यासाठी प्रत्यक्ष कर्माचा त्याग केला पाहिजे, अशी ज्ञानेश्वरांचीही भूमिका नव्हती. नैष्कर्म्य आणि निष्क्रियता ह्यांत त्यांनी भेद केला. ‘जे चालणे वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये । तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्यालागी ।।’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे (ज्ञानेश्वरी १८.१५३). वाटसरूने चालताना जलद पाऊल ऊचलले, तर त्यामुळेच तो मुक्कामी लवकर पोहोचतो आणि त्याला विश्रांती मिळू शकते. त्याचप्रमाणे कर्माचे भरपूर आचरण नैष्कर्म्याच्या कामी येते. असा ह्या ओवीचा अर्थ आहे.

    वारकरी संप्रदायाने संकुचित सांप्रदायिकतेला थारा न देता सर्वसंग्राहक वृत्ती जोपासली. वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत जे विठ्ठल, तेच एका महासमन्वयाचे प्रतीक आहे आणि संतांनी शैव, वैष्णव, बौद्ध, जैन इ. विविध धर्मधारांचा विठ्ठलाच्या ठायी संगम साधलाआहे. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा नाथपंथीयांची होती, पण लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नाथपंथाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ निवडला नाही, तर गीतेची निवड केली.

    वारकरी संप्रदायाच्या प्रवक्त्यांमध्ये विचारांची आणि भावनेची श्रीमंती होती, त्याचप्रमाणे त्याग, निष्ठा, सहिष्णुता, औदार्य असे गुणही होते. ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. तुकोबांचाही अनेक प्रकारे छळ झाला होता. पण त्यामुळे समाजापासून फटकून राहण्याची वृत्ती त्यांनी कधीही धारण केली नाही. ‘ तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात ‘ ही तुकारामांची उक्ती प्रसिद्ध आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने