ब्युरो टीम : जागतिक दृष्टिदान दिन (१० जून) निमित्त पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग व पीएमसी केअर सीटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेत्रदानाबाबत जनजागृती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी, १० जून २०२४ रोजी करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील जुने सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत नेत्रदान करण्याची प्रतिज्ञा केली.
पुणे महानगपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ.राजेन्द्र भोसले, अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना बळीवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे तसेच कमला नेहरू रुग्णालय येथील नेत्र विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत तोडकर यांनी याप्रसंगी नेत्रदान का आवश्यक आहे? याबाबत मार्गदर्शन केले. महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले की, ‘प्रत्येकाने नेत्रदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नेत्रदान हे श्रेष्ठदान आहे. नेत्रदानाबाबत असणारे समज-गैरसमज प्रत्येकाने समजून घ्यावेत, व नेत्रदानासाठी स्वतःहून पुढे यावे.’ असे आवाहनही त्यांनी केले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.सचिन पंधारे यांनी नेत्रदान करण्याची प्रक्रिया काय आहे? नेत्रदान कोण करू शकतो? नेत्रदानाबाबत समज-गैरसमज काय आहे? नेत्रदान कोणाला करता येत नाही? नेत्रदानाचे नियम काय आहेत? आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ.शीतल गुमगोल, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल घुगे, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेश कटारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा