ब्युरो टीम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवली. एक वायनाड, दुसरा मतदारसंघ म्हणजे, रायबरेली. केरळच्या वायनाडमधून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी जनतेला संबोधित केलं. राहुल गांधी यांनी आधी जनतेचे आभार मानले आणि मग कुठून खासदार व्हायचं, असा थेट प्रश्न जनतेलाच विचारला. राहुल म्हणाले की, मी द्विधा मनस्थितीत आहे, मी काय निवडू? रायबरेली की वायनाड? राहुल गांधींचा प्रश्न संपतो न संपतो, तोच समोर उपस्थित असलेल्या लोकांनी एका सुरात उत्तर दिलं... वायनाड. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, मला तुम्हाला सांगतो की, माझ्या निर्णयावर वायनाड आणि रायबरेली दोन्ही मतदारसंघातील लोकं खूश होतील. मी वचन देतो. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद आणि मी लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळीही सार्वत्रिक निवडणुकीत दोन जागांवरून निवडणूक लढवली. केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं दोन्ही मतदारसंघांमधून विजय मिळवला. यापूर्वी 2014 मध्ये देखील राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, अमेठीत त्यांचा पराभव झाला आणि वायनाडच्या जनतेनं त्यांना खासदार म्हणून निवडून लोकसभेत पाठवलं. यावेळीही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या. नियमानुसार, राहुल गांधी एकाच जागेवरून खासदार राहू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींसमोर मोठं संकट आहे की, एक जागा (रायबरेली) हा गांधी घराण्याचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो, तर वायनाडमधील लोक राहुल गांधींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अशा परिस्थितीत दोन्ही जागांच्या मतदारांशी त्यांचा थेट संबंध जाणवतो. सध्या राहुल गांधी ज्या जागेवरुन राजीनामा देतील, त्या जागेवरून पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करून विजय मिळविण्याचा प्रयत्न करण्याची संधी काँग्रेसला आहे.
वायनाडमध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, या निवडणुकीत द्वेषाचा प्रेमानं पराभव केला आहे. अहंकाराचा पराभव नम्रतेनं होतो. खरं तर वाराणसीतील पराभवातून पंतप्रधान थोडक्यात बचावले हे सत्य आहे. अयोध्येत भाजपचा पराभव झाला, तेव्हा अयोध्येतील जनतेनंही आम्ही हिंसाचार आणि द्वेषाचे समर्थन करत नाही, असा संदेश दिला आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की, दिल्लीत स्थापन झालेलं सरकार एक अपंग सरकार आहे. विरोधकांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. नरेंद्र मोदींचा दृष्टिकोनही बदलेल हे तुम्हाला दिसेल. कारण भारतातील जनतेनं त्यांना संदेश दिला आहे.
यंदाच्या लोकसभेत राहुल गांधींचा दुहेरी विजय
राहुल गांधींनी उत्तर प्रदेशच्या रायबरेली लोकसभा जागेवर भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा 3 लाख 90 हजार 030 मतांनी पराभव केला होता. तर वायनाडमध्ये राहुल गांधींनी सीपीआय(एम)च्या ॲनी राजा यांचा पराभव केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणींनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही जागांवर विजयी झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना दोन्ही मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ निवडावा लागेल. दरम्यान, यावेळी नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजलं जाणारे अमेठी पुन्हा काँग्रेसच्या खात्यात आलं आहे. येथून किशोरीलाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे
टिप्पणी पोस्ट करा