Raj Thackeray : छमछम करता है नशिला बदन… या गाण्याला कुणी चाल दिली तुम्हाला माहित आहे का ; राज ठाकरे यांनी सांगितले गुपित

 

ब्युरो टीम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अमेरिका दौऱ्यावर आहेत. बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांना एका चित्रपटाच्या गाण्याचा किस्सा सांगितला. छमछम करता है नशिला बदन… या गाण्याने अख्ख्या देशाला वेड लावलं. या गाण्याची चाल राज ठाकरे यांनी दिलेली होती. जेव्हा या चित्रपटावर चर्चा सुरू होती, तेव्हा राज ठाकरे यांनी या गाण्याची चाल गुणगुणली आणि त्यावर मित्राने गाणं लिहिलं. राज ठाकरे यांनीही त्याला दुजोरा दिला. पण या गाण्याची चाल माझी असली तरी गाण्याचे शब्द माझे नव्हते, असं राज ठाकरे यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी सर्वच विषयावर भाष्य केलं. गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. लतादीदींबाबतची एक गोष्ट सांगतो. इतर कुणाच्या आयुष्यात घडली की नाही माहीत नाही. माझ्या बाबतीत दोनदा घडली. मी नेहमी लतादीदींसोबत चर्चा करायचो. त्यांच्या प्रभू कुंजच्या हॉलमध्ये बसून आमची चर्चा व्हायची. एकदा लतादिदींसोबत चर्चा करत असताना मीनाताई आल्या. त्या लतादीदींशी तालाबद्दल बोलल्या. नंतर ऊषाताई आल्या. त्यांनीही तालाची माहिती दिली. नंतर हृदयनाथ आले. आशा ताई आल्या. प्रत्येकजण तालावर आणि गाण्यावर चर्चा करत होते. तुम्हाला सांगतो, मी त्या घरात दोनदा विम्बल्डन फायनल पाहिली आहे. कुणाच्या नशिबात असेल की नाही माहीत नाही, पण माझ्या आयुष्यात ही दोनदा घडली, असं राज ठाकरे म्हणाले.

ठरवून मैत्री केली नाही

मी ठरवून कधी कुणाशी मैत्री केली नाही. मैत्री होत गेली. ज्या क्षेत्रातील लोकांना भेटलो त्यांच्याशी त्या क्षेत्रावर चर्चा केली. मी कधीच त्यांचा राजकीय वापर केला नाही. त्यांना राजकीय व्यासपीठावर आणलं नाही. ही गोष्ट त्यांनाही माहीत आहे. हा ही गोष्ट करणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

ती खरी लोकशाही

लोकशाही कशी असते? यावरही त्यांनी भाष्य केलं. आजोबा सांगायचे विचाराणं तरुण पाहिजे. वय इकडे तिकडे जातं. तुम्ही विचारणं तरुण असाल तर राग येतो. भारतात लोकशाही आहे असं म्हणतोय. पण ती लोकशाही नाही. आपल्याला लोकशाहीचा अर्थ कळला नाही. अमेरिकेत जी आहे. ती लोकशाही आहे. लोक सुशिक्षित असून चालत नाही, तो सूज्ञ असला पाहिजे. सूज्ञ असेल तिथे लोकशाही नांदते. ऑस्करच्या व्यासपीठावर येऊन कलाकार ट्रम्पच्या विरोधात बोलतात. त्यानंतरही त्यांच्या सिनेमाला काही होत नाही. ती लोकशाही आहे, असंही राज म्हणाले.

देशाला शिव्या द्यायच्या नाही

आपल्याकडे असं होऊ शकलं नाही. आपल्याकडे राजेशाही होती. त्यामुळे आपल्याकडे लोकशाही अजून रुजली नाही. आपली लोकशाही सर्वात मोठी आहे, पण ती लोकसंख्येच्या प्रमाणात मोजली जाते. आपल्याकडच्या निवडणुका, भ्रष्टाचार या गोष्टी आहेत. मला देशाला शिव्या द्यायच्या नाही. देश उत्तम आहे. काही चुकीच्या सिस्टिम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही कोणती लोकशाही?

आताच आपल्याकडे निवडणुका झाल्या. पदवीधर मतदारसंघ यातून एक आमदार निवडून येतो. जो उमेदवार असतो त्याला पदवीधर झालेली माणसं मतदान करतात. शिक्षित माणूस रांगेत उभा राहून त्या माणसाला मतदान करतो. तो उमेदवाराचा फॉर्म आहे, त्या खाली लिहिलंय सही अथवा अंगठा. म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाहीये. पण त्याला मतदान करणारी माणसं शिकलेली पाहिजे. ही कोणती लोकशाही आहे? दिवसाढवळ्या या गोष्टी असताना त्या बोलल्याच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने